News34 chandrapur
चंद्रपूर : जिल्हयातील राजुरा तालुक्यातील मुर्ती व विहीरगाव येथे प्रस्तावित ग्रीन फिल्ड विमानतळाच्या विकास प्रक्रियेला आता वेग प्राप्त झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या विमानतळासाठी ७५.२४ हे. वनजमीन वळती करण्याच्या प्रक्रियेत उपशमन योजनांची अंमलबजावणी करण्याच्या अटीसह प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Forest land
वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दि. २३ ऑगस्ट २०२२ रोजी सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उच्चाधिका-यांसह बैठक घेतली व विस्तृत चर्चा केली.
Airport chandrapur
ग्रीन फिल्ड विमानतळासाठी मुर्ती व विहीरगाव येथील ७५.२४ हे. वनजमीन वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वळती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला होता. प्रामुख्याने भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या शिफारशी विचारात घेवून ग्रीन फिल्ड विमानतळासाठी चंद्रपूर जिल्हयातील ७५.२४ हे. वनजमीन वळती करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर न करण्याचा राज्य शासनाने यापूर्वी निर्णय घेतला होता. सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने भारतीय वन्यजीव संस्थेने सादर केलेल्या अहवालात प्रामुख्याने दोन पर्याय सुचविले आहेत.
Sudhir mungantiwar
या जागेचे वन्यजीवांच्या दृष्टीने व विविध कॉरीडॉर जोडण्यासाठी असणारे अनन्यसाधारण महत्व विचारात घेवुन विमानतळाच्या बांधकामासाठी सदर वनक्षेत्र वळते करण्यात येऊ नये तसेच विमानतळासाठी सदर जागेशिवाय अन्य जागेचा पर्याय नसेलच तर भारतीय वन्यजीव संस्थेने सुचविलेल्या उपशमन योजना व सुधारणा अंतर्भुत करुन विमानतळाचे बांधकाम करता येऊ शकेल, असे दोन पर्याय भारतीय वन्यजीव संस्थेने सादर केलेल्या अहवालात सुचविण्यात आले आहे.
विमानतळासाठी पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे या प्रकरणी उपशमन योजनांची अंमलबजावणी करण्याच्या अटीसह प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळण्याच्या दृष्टीने आपण केंद्रीय वन व पर्यावरण मंत्र्यांची भेट घेवून प्रयत्नांची शर्थ करु व चंद्रपूर जिल्हयाच्या औद्योगीक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या विमानतळ उभारणीचा मार्ग मोकळा करु, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.