News 34 chandrapur
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल:- तालुक्यातील मौजा बेंबाळ येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत भाजपाचे माजी पंचायत समिती सभापती तसेच तत्कालीन पाणीपुरवठा समिती अध्यक्ष चंदु मारगोनवार व समिती मधील अन्य सदस्यांनी लाखोंची अफरातफरी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. सदर योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे बेंबाळ गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
शासनाची पाणीपुरवठ्याची करोडो रुपयाची योजना थंडबस्त्यात पडली असून भ्रष्टाचार करणारे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पाणीपुरवठा योजनेला न्याय मिळावा व जनतेला पाणी मिळावे याकरिता गावकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून निवेदने दिली व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीला घेऊन शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला.भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे उपलब्ध असूनही अजूनपर्यंत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई संबंधित प्रशासनाने न करता उलट पाठराखण करीत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांत शासन व प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून यामध्ये जिल्ह्यातील भाजपाचे मोठे राजकीय नेते आरोपीला पक्षाच्या बदनामीपोटी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Corruption
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मौजा बेंबाळ येथे पूरक नळ पाणीपुरवठा योजना २०१५ ला मंजूर झाली. भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून ८८,०२९०३/- एवढी रक्कम जमा झाली. या रकमेवर १,५६,५६०/- रुपये बँकेकडून व्याज मिळाली. उसनवार जमा म्हणून ५४,५००/- समितीला दिले होते. एकंदरीत ९०,१३,९६३/- (नव्वद लक्ष तेरा हजार नवशे त्रेसष्ठ रूपये) एवढ्या रकमेची ही योजना होती. आयकर भरणा, विक्रीकर भरणा, विमा मिळून २,२९,०५६/- रक्कम समितीने भरली होती. सदर समितीने कंत्राटदार दीपक गोणेवार यांना टप्प्याटप्प्याने ७२,४४,३३६/- रुपये चेकद्वारे व्यवहार केला. एक हजार रुपयांच्या वरच्या रकमेचा व्यवहार हा चेकद्वाराच केला जावा ही अट असताना तात्कालीन समिती अध्यक्ष चंदु मारगोनवार यानी परस्पर दोन लाख रुपये दिनांक १९ डिसेंबर २०१७ ला आपल्या खात्यात वळविले तर परस्पर समितीने एकूण ११ लाख ४० हजार रुपये टप्प्याटप्प्याने सेल्फ कॅशने काढले. याबाबत गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मिथाली सेठी व पाणीपुरवठा अधिकारी बारसागडे यांच्याकडे पुरावेनिशी तक्रार करून कारवाईची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर योजनेची खोलवर चौकशी करण्यासाठी समिती नेमून समितीद्वारे चौकशी केली. समितीने दिलेल्या अहवालात सदर योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून ही योजना बंद स्थितीत आहे असा अहवाल दिला. त्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ७ एप्रिल२०२२ रोजी सुनावणी घेतली व सुनावणीदरम्यान आरोपींवर ११ लाख ४० हजार रुपये व कंत्राटदारांचे सात लाख रुपये वसुली निघाली. हा अफरातफर केलेला निधी तात्काळ भरणा करावा असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती अध्यक्ष व समितीला दिले होते. त्यानंतरही भ्रष्टाचार केलेली रक्कम भरणा न केल्यामुळे दिनांक ८ जून २०२२ ला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी उचल केलेली जादाची रक्कम कार्यालयात जमा करावी अन्यथा प्रशासकीय कार्यवाहीस करण्यास पात्र राहाल असे पत्र तात्कालीन पाणीपुरवठा अध्यक्ष व समितीला दिले. परंतु अद्याप चार महिने लोटूनही भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींनी ना रक्कम जमा केली ना कंत्राटदाराला पैसे दिले त्यामुळे सदर योजना बंद अवस्थेत आहे व आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून भ्रष्टाचार करणाऱ्यांमुळे शासनाच्या करोडो रुपयांची फसवणूक झाली व पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत आहेत.आरोपींनी राजकीय दबाव प्रशासनावर वापरण्याचा प्रयत्न करून यामधून आपली सुटका व्हावी असे प्रयत्न सुरू केले आहे.
मागील वर्षीपासून सदर प्रकरण मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गाजत असून यामुळे पक्षाची बदनामी होत आहे असे भाजपाच्या अंतर्गत गोटात चर्चा आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व प्रशासकीय कार्यवाही करावी तसेच बंद योजना तात्काळ सुरू करावी अशी मागणी बेंबाळ येथील गावकऱ्यांनी केलेली आहे. सदर प्रकरणात गावकऱ्यांना न्याय न मिळाल्यास या विरोधात जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र हल्लाबोल मोर्चा काढणार तसेच येणाऱ्या आगामी विधानसभेच्या अधिवेशनात जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींकडून हा प्रश्न विधानसभेत लावुन धरणार असा इशारा बेंबाळ वासिय ग्रामस्थांनी दिला आहे.