News 34 chandrapur
चंद्रपूर : वेकोलित नोकरी लावून देण्याच्या नावावर चंद्रपुरातील एका युवकाला लाखो रुपयांनी गंडविल्याचा प्रकार पुढे आला. दरम्यान, याप्रकरणात फिर्यादी युवकाच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम मारोती ठाकरे रा. घुटकाळा वार्ड चंद्रपूर असे फिर्यादीचे तर विवेकानंद सरकार रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर, डॉ. पराग पोतदार रा. बुटीबोरी, युपकुमार पंचबुद्धे बुटीबोरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. Cheating
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम ठाकरे याचे एमबीए पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो नोकरीच्या शोधात होता. याचदरम्यान घुटकाळा येथील हिमांगीनी मेडिकल शॉप चालविणाऱ्या विवेकानंद सरकार याच्या तो संपर्कात आला. विवेकानंदने शुभमशी मैत्री वाढविली. यानंतर वेकोलितील काही अधिकारी आपल्या ओळखीचे असून, त्यांच्या माध्यमातून तुला नोकरी लावून देऊ असे आमिष त्याला दाखविले. वारंवार विवेकानंद सरकार हा शुभमच्या घरी येऊ लागला. शुभमच्या वडिलाला सुद्धा त्याने मुलाला नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखविले. नोकरीच्या शोधात असलेला शुभमही अलगद विवेकानंदच्या जाळ्यात अडकला. १ एप्रिल रोजी विवेकानंदने शुभम आणि त्याच्या वडिलाला बुटीबोरी येथे नेले. तेथून पराग पोतदार हा गाडीत बसला. यानंतर नागपूर गणेशपेठ बसस्थानकासमोर युपकुमार पंचबुद्धे यांच्याशी ओळखी करून दिली. नंतर सर्वजण सिल्लेवाडा येथील वेकोलिच्या व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्रात गेले. तेथे एका खोलीत बसलेल्या व्यक्तीशी आरोपींनी शुभमची भेट करून देत मुलाखतीची आणि परीक्षेची औपचारिकता पार पाडली. यावेळी साहेबाला देण्यासाठी म्हणून विवेकानंद सरकार याने १ लाख रुपये मागितले. Employment fraud wcl
ती रक्कम सरकारने पोतदार आणि युपकुमार पंचबुद्धे यांना दिली. यानंतर नियुक्तीपत्र तयार करण्याच्या नावाखाली आरोपी निघून गेले. ६ एप्रिल रोजी पंचबुद्धे यांनी शुभम ठाकरे याला वीटीसी ट्रेनिंग सेंटर उमरेड येथे जाण्यासाठी सांगितले. त्यांनी नियुक्तीपत्र दाखवून वडिलांकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. काही वेळांनी आरोपींनी परत १२ लाखांची बोलणी झाली असून ४ लाख रुपयेच दिले. उर्वरित रक्कम साहेबाला द्यावे लागणार असे सांगून परत रक्कम मागितली. यावेळी पुन्हा काही रक्कम दिली. नियुक्तीपत्र घेऊन एका महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, आपल्याला कोणतेच पत्र मिळाले नाही असे सांगितल्याने संशय आला. याबाबत विवेकानंद सरकार याच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. त्यामुळे मिळालेले नियुक्तीपत्र घेऊन एरिया ऑफीसमध्ये जाऊन विचारणा केली असता नियुक्तीपत्र बनावट असल्याचे सांगितले.
फसविण्यात आल्याचे लक्षात येताच शुभमने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून विवेकानंद सरकार रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर, डॉ. पराग पोतदार रा. बुटीबोरी, युपकुमार पंचबुद्धे बुटीबोरी व अन्य एका आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी शुभम आणि त्याच्या वडिलांनी केली आहे. शुभम सारखेच शहरातील अन्य युवकांचीही अशाप्रकारे फसवणूक झाल्याची माहिती असून, मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
