News 34 chandrapur
चंद्रपूर - आतापर्यंत ओबीसी महिलांना संधी मिळत नव्हती. आता फार मोठ्या प्रमाणात ओबीसी महिला लिहायला लागल्या, त्यामुळे त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. लेखन करायच असेल तर फार मोठ्या प्रमाणात वाचन करणे आवश्यक आहे. आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा येत आहे. तरीसुद्धा साहित्यिकांनी निर्भिडपणे लेखन करणे गरजेचे आहे, असे परखड प्रतिपादन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी केले.
त्या फुले-शाहु-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य-संस्कृती संवर्धन समिती नागपुरच्या वतीने चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहामध्ये तिसऱ्या फुले-शाहु-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या.
OBC Women's Literature Conference
संमेलनाचे उदघाटन मशाल पेटवून झाले, या प्रसंगी जाकीर हुसेन काॕलेज, दिल्लीचे डाॕ.लक्ष्मण यादव, युवा नेत्या, शिवानी वाडेट्टीवार, माजी संमेलनाध्यक्ष व झाडीबोली कवयित्री अंजनाबाई खुणे, बहुजन संघटक संचालक राहुल खांडेकर, ज्येष्ठ समाजसेविका प्रभाताई वासाडे, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डाॕ.अॕड.अंजली साळवे विटनकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॕड.दत्ता हजारे, दैनिक बहुजन सौरभचे मुख्य संपादक मिलिंद फुलझेले, श्रीगुरुदेव युवा मंचचे मुख्य प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक व संमेलनाच्या मुख्य प्रवर्तक प्राचार्या संध्या राजुरकर उपस्थित होत्या.
ज्या थोर महामानवांनी या देशाला घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना व त्यांच्या कार्यालाच नामशेष करण्याचा प्रयत्न या देशात केला गेला. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जर घटनेत ३४० कलम टाकले नसते तर आज ओबिसींना आरक्षण मिळाले नसते. महात्मा फुलेंच्या पाठीमागे सावित्रीबाई फुले या खंबीरपणे उभ्या होत्या त्यामुळे महात्मा फुले यांनी समाजसेवेच व्रत स्विकारले. येऊ घातलेल नविन शैक्षणिक धोरण हे बहुजन समाजासाठी घातक आहे. त्यामुळे फुले-शाहु-आंबेडकर यांचे विचार देशातील कानाकोपर्यात पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतीपादन उद्घाटक डाॕ.लक्ष्मण यादव यांनी केले. यानंतर अंजनाबाई खुणे, राहुल खांडेकर, शिवानी वडेट्टीवार, प्रभाताई वासाडे, मिलिंद फुलझेले , ज्ञानेश्वर रक्षक यांनी मार्गदर्शन केले.
बहुजन लेखिकेने तीच्या लेखनात क्रांतीच्या मशाली येऊ द्याव्या असा संदेश देत मान्यवरांचे स्वगत समेलनाच्या स्वागताध्यक्षा डाॕ.अॕड.अंजली साळवे विटनकर केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संमेलनाची भूमिका प्राचार्या संध्या राजुरकर यांनी मांडली. तर कार्यक्रमाचे संचालन डाॕ.वीणा राऊत व आभार विलास गजभीये यांनी मानले.

