News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेत प्रवेश घ्यावा या उद्देशाने गडचांदूर येथील नामांकित शाळेतील शिक्षकांमध्ये कमालीची स्पर्धा पहायला मिळत आहे.टीसी मिळवण्यासाठी हे शिक्षक 46 डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या रखरखत्या उन्हात गावोगावी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंतची वारी करीत आहे.आम्ही कसे,आमची शाळा कशी आणि आमच्या शाळेचे शिक्षण किती दर्जेदार,हे विद्यार्थ्यांच्या पालकांना पटवून देण्यासाठी यांची अक्षरशः दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
हा खटाटोप नोकऱ्या वाचविण्यासाठी तर नाही ना ? अशी शंका सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे.स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वळल्याने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे.शाळेतील तुकडी बंद होण्यापासून वाचविण्यासाठी शिक्षकांमध्ये टीसीसाठी जणू स्पर्धाच लागली की काय ? हे कळायला मार्गच उरला नाही ! याची प्रचीती 10 मे रोजी गडचांदूरात आली.येथील एका जिल्हापरिषद शाळेत विद्यार्थी,पालकांना टीसीचे वाटप सुरू होते.याचे औचित्य साधून येथील काही नामांकित शाळेतील शिक्षकांनी एकच गर्दी केली होती.आश्चर्यची बाब म्हणजे यातील एका स्वघोषीत नामवंत शाळेतील शिक्षकांनी चक्क जेवणाचे डबे व थंड पाण्यासह सकाळपासूनच याठिकाणी बस्तान मांडल्याचे बोलले जात आहे.ज्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी पोलिंग बूथवर मतदारांना नाव शोधून चिठ्ठी लिहून देतात त्याचप्रमाणे हे शिक्षक चक्क खुर्च्या घेऊन जि.प.शाळेच्या त्या मुख्य खोली बाहेर बसून असल्याचे दिसून आले.आता संबंधीत जि.प. शाळेने स्वतः यांना खुर्च्यांची व्यवस्था करून दिली अथवा नाही ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.एका जि.प.शाळेने खाजगी शाळेच्या शिक्षकांची अशी सेवा करणे हे कितपत योग्य ! याविषयी उलटसुलट चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.असे असताना जि.प. शाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना टीसी देताना एका विशिष्ठ शाळेत प्रवेश घेण्यासाठी परावृत्त करीत असल्याची चर्चा असून हे जर खरे असेल तर ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.शेवटी यामागे दडलंय तरी काय ! संबंधित विभागाने यासंदर्भात सत्यता पडताळून दोषी आढळल्यास कारवाई करण्याची गरज आहे.वास्तविक पाहता आपल्या पाल्ल्याने कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा हे ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.मग टीसी देताना यांना विशेष मार्गदर्शनाची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही का असेना मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही टीसी मिळविण्यासाठी शिक्षकांमधील चढाओढ व रस्सीखेच पाहून "कुणी टीसी देता का टीसी" असे म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आल्याची उपहासात्मक चर्चा सुरू आहे.या सर्व घडामोडीत मात्र "कोणाता झेंडा घेऊ हाती" अशी अवस्था काही पालकांची झाली असावी,हे मात्र तेवढेच खरे.
