चंद्रपूर - शहर महापालिकेच्या माध्यमातून जलप्रदूषण रोखण्यासाठी "माझी वसुंधरा अभियाना"अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी "रेड टँकर" ही अभिनव योजना अंमलात आणण्यात आली असून, त्याचा शुभारंभ बुधवार, दिनांक २६ जानेवारी रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते झाला. Red tanker
अंचलेश्वर गेट रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपमहापौर राहुल पावडे, सहायक आयुक्त विद्या पाटील, बांधकाम शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, यांत्रिकी विभागाचे रवींद्र कळंभे यांची उपस्थिती होती.
Sewage treatment
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपामार्फत हमतनगर परिसरात २५ एमएलडी क्षमतेचे तर पठाणपुरा परिसरात ४५ एमएलडी, तर आझाद बगीचा येथे ५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आहे. हे पाणी घरगुती व खासगी इमारत बांधकाम आणि अन्य कामासाठी, झाडांसाठी, चौक सौंदर्यीकरण, शौचालय, कारखाने आदी ठिकाणी वापरता येऊ शकते. मनपाच्या टँकरद्वारे ४०० रुपये प्रति टँकर, तर संबंधितांच्या टँकरला १५० रुपये प्रति टँकर प्रमाणे पाणी देण्यात येणार आहे.
