गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठे शहर गडचांदूरच्या मध्यभागी विराजमान असलेली पूर्वी माणिकगड व सध्या ultratech cement अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान वनक्षेत्रातील निसर्गरम्य कुसुंबी गावात आहे. सिमेंट बनविण्यासाठी उपयोगी असलेले दगड,चुनखडी रोपवेच्या मदतीने सदर सिमेंट कंपनीपर्यंत आणली जाते. बैलमपूर,हिरापूर, अमलनाला, नोकारी, गोवारीगुडा, बाम्बेझरी अशा ठिकाणावरून रोपवे व कन्वेयर बेल्टद्वारे खदानी पासून गडचांदूर पर्यंत अविरतपणे चुनखडी दगडाची वाहतूक सुरू असते.या ठिकाणी अनेकदा चुनखडी वाटसरूंच्या डोक्यावर पडून अपघात सुद्धा घडले आहे.असे असताना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याऐवजी केवळ "सावधान,पाईप कन्वेयर बेल्ट के निचेसे सावधानी पुर्वक गुज़रे" असे गगनचुंबी बोर्ड लावून कंपनी प्रशासन मोकळी झाली आहे.यामुळे लोकांचे जीव धोक्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अनेकदा धुळीचे कण डोळ्यात जाण्याचे प्रकार घडले असून रस्त्यावर चुनखडीचे खच पडल्याने याचा फटका विविध वाहनांसह पायदळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना बसत असल्याची घटना पुढे आली आहे. अनेकदा तक्रारी करूनही कंपनी दखल घेत नसल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.अमलनाला येथे पर्यटन स्थळ असल्याने या रोपवेच्या लगत नेहमी tourist पर्यटकांची गर्दी असते. अनावधानाने एखाद्या वेळी दगड पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कंपनी व्यवस्थापनाने या गावांच्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी गडचांदूर नगरपरिषदेत काँग्रेस गटनेता तथा नगरसेवक विक्रम येरणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून याविषयी त्वरित सकारात्मक उपाययोजना करा अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा येरणे यांनी दिला आहे.
खदानीपासून गडचांदूर येथील cement company सिमेंट कंपनीपर्यंत असलेल्या रोपवे व कन्वेयर बेल्टद्वारे पडत असलेल्या चुनखडी बाबत मोका चौकशी करून शासनाच्या अटी व शर्तींप्रमाणे रहदारीच्या रस्त्यावर चुनखडी पडणार नाही याविषयी उपाययोजना करण्याची सूचना करावी.तसेच चौकशीच्या वेळी परिसरातील लोकांना याची माहिती द्यावी अशी मागणी सुद्धा येरणे यांनी केली आहे.शासनाकडून येथील अमलनाला सिंचन प्रकल्प क्षेत्रात पर्यटन स्थळाचे निर्माण कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.लवकरच याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.अशा परिस्थितीत याठिकाणी पडणार्या चुनखडीचे दगड व कन्वेयर बेल्टचा कर्णबधिर करणारा कर्कश आवाज पर्यटकांना मोठा त्रासदायक ठरणार आहे.ही बाब लक्षात घेऊन शासनाने वेळीच याविषयी समाधानकारक उपाययोजना करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन उभाण्याचा इशारा नगरसेवक येरणे यांनी दिला असून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे,अधीक्षक अभियंता सिंचन विभाग चंद्रपूर यांच्यासह संबंधितांना निवेदन पाठवले आहे.