भद्रावती - चंद्रपूर मधील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती क्षेत्र धोक्यात आले असून, औद्योगिक व इतर प्रदूषण वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या कारखान्याच्या व खाणीच्या मनमानीमुळे जंगल क्षेत्रावर अतिक्रमण होत आहे. नदीपात्रात कोळशाच्या खाणी निषिद्ध क्षेञात माती टाकून भविष्यात महापुरांना आमंत्रण देत आहेत. घुगुस व गडचांदूर शहरे सिमेंट उद्योगामुळे हवेत सिमेंटच्या कणांचे प्रमाण बरेच वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडत असून यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे. सरकार व प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नुकतेच STEP या पर्यावरण संरक्षण विद्यार्थी ,शिक्षक परिषदेतर्फे भद्रावती येथे चंद्रपूर- नागपूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला चंद्रपूर वाचवा या संकल्पनेसह पर्यावरणाच्या संरक्षणासाठी दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरण वाचवा चंद्रपूर वाचवा घोषणा फलक हातात घेऊन शांतताप्रिय आंदोलन केले .सदर आंदोलन Swedish environmentalist Greta Thunberg स्वीडिश पर्यावरणवादी ग्रेटा थानबर्ग हिच्या 'फ्रायडे फ्युचर' Friday future या चळवळीने प्रेरित होते. यात जिल्हा परिषद शाळा चिरादेवि, कर्मवीर विद्यालय गवराळा, जिल्हा परिषद हाय स्कूल व निळकंठ शिंदे विद्यालय- महाविद्यालय, भद्रावती शहरी -भागासह ग्रामीण भागाचे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.