कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या कोरपना,या तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायतची दुसरी सार्वत्रिक निवडणूक होते आहे. या निवडणुकीत नशिब अजमावणाऱ्या आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या.रॅली व डोर टु डोर भेटीगाठी करून मतदारांचे मन जिंकण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर झाला.गेल्या आठवड्यापासून विविध प्रकारे याठिकाणी सुरू असलेल्या प्रचार तोफा थंडावल्या असून उद्या 21 डिसेंबर मंगळवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असून डिसेंबरच्या गुलाबी थंडीत याठिकाणी निवडणुकीच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याचे अनुभवास येत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रात्रंदिवस जीवाचे रान करणारे उमेदवार व पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे शेवटची ही रात्र निर्णायक ठरणार आहे. "जागते रहो, रात्र वैऱ्याची आहे" यानिमित्ताने असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. Nagar panchayat election
कोरपना नगरपंचायत मध्ये यंदा काँग्रेस विरूद्ध भाजपा,शेतकरी संघटना,शिवसेना व कोरपना शहर परिवर्तन आघाडी(राकाँ) असे थेट लढतीचे चित्र असून यामध्ये काँग्रेसकडून 14 व युतीचे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. 17 सदस्य असलेल्या या नगरपंचायतमध्ये गेल्या वेळी काँग्रेस 14,शेतकरी संघटना, राकाँ व अपक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकल्या होत्या. यंदा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 3 प्रभागातील निवडणुक स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सध्या 14 जागेसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख असून प्रत्येक हालचालीवर पोलिस करडी नजर ठेऊन आहे.
