चंद्रपूर - तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात कत्तलीसाठी कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दापाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. गडचिरोली जिल्ह्यातून येणारी तिन्ही वाहने लोहारा गावाजवळ ताब्यात घेण्यात आली. यावेळी चार तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, ९८ जनावरांची सुटका करण्यात आली. सर्व जनावरे गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने शनिवारी ४ डिसेंबरला केली. Slaughter of animals
चंद्रपूर जिल्ह्यालगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे मोठ्या प्रमाणात नेण्यात येतात. तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनात जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जाते. जनावरांची तस्करी करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. याबाबतच्या तक्रारी पोलिस विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर आळा बसावा, यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी विशेष पथक तयार करून Animal trafficking जनावरांची तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती.
गडचिरोली जिल्ह्यातून ३ कंटेनरमध्ये जनावरे कोंबून तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह लोहारा गावाजवळ सापळा रचला. यावेळी तस्करीच्या वाहनांची पायलेटिंग करणारा मुख्य म्होरका इमरान गोसीर खान (वय ३५, रा. गडचिरोली) याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन-दोन किलोमीटरच्या अंतरावर तिन्ही कंटेनर ताब्यात घेतले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता चार ते पाच जनावरांचा मृत्यू झाला होता. उर्वरित जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली. Lcb chandrapur
यावेळी शेख अकबर शेख चांद (वय ३१, रा. हैदराबाद), शेख मेहबूब शेख (वय ३४, रा. हैदराबाद), इमरान गोसीर खान (वय ३५, रा. गडचिरोली), शेख मेहबूब शेख अलताफ (वय १८, रा. वाकडी, तेलंगणा), मुक्तार मुबारक (वय २७, रा. वाकडी, तेलंगणा) यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात संजय आतकुलवार, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गौरकार, सतीश बगमारे, दिनेश हरडे यांच्या पथकाने केली. inter-state gang
