चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर: कोरोनाविषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. Omicron virus ओमिक्रॉन विषाणूंचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी नूतन वर्षाचे स्वागत कोणताही जल्लोष न करता घरी राहून अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने 31 डिसेंबर 2021 (वर्षअखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Chandrapur administration rules
कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2021 रोजी व दि.1 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. राज्यात दि. 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशांचे पालन करण्यात यावे.
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 च्या स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्केपर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनीटायजरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. तसेच 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर, अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टंन्सींग (सामाजिक अंतर) राहील, तसेच मास्क व सॅनीटायजरचा वापर होईल,याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
New year celebration guidelines
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशा वेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.