गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या नावारूपास आलेले सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत असल्याने ग्राहकांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. ग्राहकांची पोस्ट संबंधी विविध कामे अक्षरशः खोळंबली असून याठिकाणी कर्मचारी नसल्याने सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण पोस्टाचा डोलारा एकटा पोस्टमास्तर सांभाळत आहे.याठिकाणी फक्त आणि फक्त पैसे जमा करणे व पैसे परत करणे एवढेच काम सुरू असून पार्सल करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना परत केले जात आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये दोन काउंटर असून १५ गावांचे काम एकटे सांभाळणे कठीण होत आहे. रिक्त पदे भरण्यात आली नाही. एकाची बदली झाली आणि जे कर्मचारी आहे तेपण रजेवर आहे.अशी माहिती येथील पोस्टाचे सब पोस्टमास्तर वैजनाथ नरवळे यांनी दिली असून चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांच्याशी यासंदर्भात सदर प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता "पदे रिक्त आहे,ती भरली नसल्याने व जे कर्मचारी आहे ते दिवाळी निमित्ताने रजेवर गेल्याने ग्राहकांना त्रास होत आहे. यला नाईलाज असल्याचे त्यांनी सांगितले."
मागील महिनाभरापासून पोस्टात कर्मचारी नाही आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत पार्सलची कामे होणे शक्य नाही. असे स्पष्ट सांगून ग्राहकांना परत पाठवले जात आहे.यामुळे ग्राहकांना विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ग्राहकांची होणारी गैरसोय दूर करून दिलासा द्यावा अशी मागणी त्रस्त ग्राहकांनी केलेली आहे.आता याविषयी काय घडते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
