चंद्रपूर - राज्यातील भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचे पितळ उघड पाडणारे भाजप नेते किरीट सोमय्या kirit somayya यांच्याकडे चंद्रपुरातील मनपाच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करीत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी पत्राद्वारे केली आहे. Corruption
राज्यातील अनेक आमदार, मंत्री यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे काम सोमय्या करीत असून ती चांगली बाब आहे मात्र भाजपची सत्ता असलेल्या चंद्रपूर मनपात असे अनेक भ्रष्टाचाराचे गैरप्रकार झाले असून त्यावरही सोमय्या यांनी लक्ष घालावे अशी मागणी त्या पत्रात करण्यात आली आहे.
चंद्रपूर मनपात अमृत योजनेत देण्यात आलेल्या कंत्राटात अनियमितता आणि पक्षपात, कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या करारामध्ये निविदा नियमांचे उल्लंघन, महापौरांच्या वाहनांसाठी अतिवीशीष्ट क्रमांक घेण्यासाठी जनतेच्या पैश्याचा वापर, मनपा आणि प्राधिकरणासाठी भाड्याने घेतलेल्या खाजगी वाहनांचा रेकॉर्ड आणि डेटा नष्ट करणे, शहरातील मध्यभागी असणाऱ्या आझाद उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाचे कंत्राट देताना गैरव्यवहार व कोविड दरम्यान सरकारी योजना व निधीची अनियमितता आणि दुरुपयोग.
भाजपची सत्ता असलेल्या चंद्रपूर मनपात गैरव्यवहार व भ्रष्टाचारांची यादी न संपणारी असून यावर माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लक्ष देत सदर गैरव्यवहार उघडकीस आणावे अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे.
सदर तक्रारींचे पत्र फुसे यांनी 3 नोव्हेंबर ला किरीट सोमय्या यांच्याकडे पाठविले असून आता त्या पत्रावर काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
