चंद्रपूर/दुर्गापूर - चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथे दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत मोठा राडा झाला. मागील ग्रामसभेत दारू दुकानाला परवानगी नाकारल्यानंतरही ग्रामपंचायतीने हा ठराव आजच्या विषयसूचित पुन्हा ठेवला. मात्र ग्रामस्थांनी रुद्रावतार धारण केल्यावर ग्रामपंचायतीला नमते घ्यावे लागले.
चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथे दारू दुकानाच्या परवानगीवरून ग्रामसभेत जबरदस्त राडा बघायला मिळाला. दुर्गापूर ग्राम पंचायतीच्या मागील ग्रामसभेत या दारू दुकानाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही आजच्या विषयसूचित ग्रामपंचायतीने हा ठराव अगदी दुसऱ्या क्रमांकावर ठेवला. दुर्गापूरच्या वार्ड क्रमांक 4 मध्ये देशी दारू दुकान आणि मोबाइल टॉवर नको या मागणीसाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनोखी एकजूट दाखविली. ग्रामस्थांनी या विषयासंदर्भात संतप्त भूमिका घेतली. नागरिक आणि यंत्रणा यांच्यात हमरीतुमरी झाल्यावर सभेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. तब्बल पाच तास चाललेल्या ग्रामसभेत अखेर ग्रामस्थांचा विजय झाला. वीज-रस्ते- पाणी- स्वच्छता या ऐवजी दारू दुकान आणि मोबाइल टॉवरला अनुकूलता असणाऱ्या ग्रामपंचायतीचा पराभव झाला.
Durgapur Gram Panchayat
एकीकडे दुर्गापूर परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तर दुसरीकडे यावर मार्ग काढत विकासकामे अजेंड्यावर ठेवण्याऐवजी ग्रामपंचायतीने भलताच प्राधान्यक्रम ठरविला. आजच्या सभेत मात्र दारू दुकान आणि मोबाइल टॉवर नको यावर शिक्कामोर्तब झाले.
Villagers protest against liquor shop
जिल्ह्यात केवळ दुर्गापूरच नव्हे तर ब्रह्मपुरी- सावली -व्याहाड -गडचांदूर व ऊर्जानगर येथेही अशाच पद्धतीने दारू दुकानांना स्थानिकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. यातून कोण व कसा मार्ग काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
