गडचांदूर :- शेती उपयोगी वस्तू ने-आण तसेच काढणीच्या हंगामात पीक घरी आणण्यासाठी शेतकरी जास्त प्रमाणात बैलबंडीचा वापर करतात. या कामात कधीकधी सायंकाळ होते.राम भरोसे अंधारातून मुख्य मार्गावरून येत असताना कित्येकदा जीवघेणे अपघात सुद्धा घडले आहे.कित्येक शेतकऱ्यांनी जीव गमवला असून मागील काही दिवसात जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळेस अंधार पडल्यानंतर शेतकरी त्यांची बैलबंडी घेऊन मेन रोडने शेतातून घरी परतत असताना येत रस्त्यावर चालणार्या वाहनांनी बैलबंडी न दिसल्याने शेतकर्यासह त्यांचे बैल मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहे.
अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या उदात्त हेतूने २९ आक्टोंबर रोजी गडचांदूर पोलीसांनी सायंकाळच्या सुमारास उशिरापर्यंत एक विशेष मोहीम राबवून शेतशिवारातून शहरात येणाऱ्या प्रत्येक बैलबंडीला थांबवून बंडीला रेडियमचे स्टिकर चिटकवले. यामूळे वाहन चालकांना बैलबंडी दिसेल व भविष्यात होणार्या घटनांवर आळा बसेल.सदरचे उपक्रम ठाणेदार सत्यजीत आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले असून पोना धर्मराज मुंडे,वाहतूक पोलीस सुभाष तिवारी,व्यंकटेश भटलाडे यांनी पार पाडले. बळीराजाच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या सदर उपक्रमामुळे गडचांदूर पोलीसांचे कौतुक होत आहे.
