बल्लारपूर - वेकोलीचे बल्लारपुर एरीया अंतर्गत असलेल्या कोळसा खाणीतुन जड वाहनांमधुन होणा-या कोळशाच्या वाहतुकीमुळे राजुरा ते कवठाळा मार्गाची अक्षरशः दुर्दशा झालेली असुन माथरा ते साखरी रस्त्याची अगदी चाळण झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले आहेत. यामुळे परीसरातील जनतेला प्रवास करणे कठीण झालेले आहे. या रस्त्यावर नेहमी अपघात होेत असुन जीवीत हानी सुध्दा झालेली आहे. रस्त्यावरील धुळीमुळे प्रदुषन वाढले आहे. याचा परीणाम जनतेच्या आरोग्यावर आणि शेतातील पिकांवर सुध्दा होत आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असला तरी वेकोलीने यावरून नियम पायदळी तुडवुन सर्रास जड वाहतुक करून दुर्दशा केली आहे. हा रस्ता वळविण्याकरीता वेकोली प्रयत्नात असुन त्यामुळे जनतेला अधिक फेरा मारून जावे लागणार आहे. एकीकडे बांधकाम विभागाचे रस्त्यांचे नुकसान आणि यातुन जनतेला त्रास होत असताना वेकोली रस्त्याची डागडुगी देखील करत नाही. धुळीचा त्रास होऊ नये म्हणुन पाणी मारले जात नाही. या परीसरात वेकोलीने मोठया प्रमाणात शेत जमीन संपादीत केली. कोळसा खाणी सुरू केल्या मात्र जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा केली. पाण्याची पातळी खोल गेली. नदी नाल्यांच नैसर्गिक प्रवाह बदलले. यामुळे पुराचा धोका वाढला, प्रदुषण वाढले. कंत्राटी खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार देत नसल्यामुळे बेरोजगारी कमी झालेली नाही हि वस्तुस्थिती आहे.
यामुळे या परीसरातील जनतेत असंतोष आहे. वेकोली प्रशासनाने याकडे गांर्भीर्याने लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात असे आवाहन महाराष्ट्् प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी केले आहे.