चंद्रपूर, ता. ६ : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असतांनाच डेंग्यु, मलेरीया या आजारांचे रुग्णसुध्दा सर्वत्र आढळून येत आहे. त्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने मनपा कार्यक्षेत्रात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहेत.
Dengue maleria in chandrapur
बुधवार, ता. ८ सप्टेंबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात मुख्य प्रशासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी रक्तदान करणार आहेत. महानगरपालिका मुख्य इमारत गांधी चौक येथे बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान होईल. १४ सप्टेंबर २०२१ सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत मनपा झोन कार्यालय क्र १ येथे, दिनांक २१ सप्टेंबर २०२१ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत मनपा झोन कार्यालय क्र २ येथे, २८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यंत मनपा झोन कार्यालय क्र. ३ मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.