कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल येथे २ सप्टेंबर रोजी सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने "शेतकरी संवाद मार्गदर्शन मेळावा" आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रो.ह.यो.विधीमंडळ समिती अध्यक्ष तथा आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे होते तर प्रमूख मार्गदर्शक म्हणून अध्यक्ष कृषी मुल्य आयोग,सदस्य केंद्रीय पंचायत राज समिती ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार तथा माजी आमदार पाशा पटेल,विशेष मार्गदर्शक कोकण केयर डेव्हलपमेंट सेंटर को.बँकेचे संजीव करपे, कायदेविषयक मार्गदर्शक शेतीविषयक कायदे तज्ञ माजी आमदार अॕड.संजय धोटे, आमदार अमोल मिटकरी इतरांची उपस्थिती होती.जागतिक पातळीवर निर्माण झालेली परिस्थिती अभ्यासक भविष्यातील समस्यांवर चिंतन करीत असून हवामानातील बदल,दुष्काळ, अतिवृष्टी असे संकट,निर्माण झालेली परिस्थिती,हवामानाच्या बदलत्या ऋतूं बरोबरच उत्पादन घेण्याची गरज शेतकऱ्यांवर आली आहे.असे प्रतिपादन आमदार चंद्रिकापुरे यांनी अध्यक्षस्थाना वरून केले.
अभ्यासपूर्ण शेतकरी समस्यांच्या विषयाला हात घालत पृथ्वीरक्षण व मानवविकास,आवश्यक असलेल्या गरजा भरून काढणे कठीण झाल्याने जगाच्या पातळीवर चिंतन होऊ लागले आहे. शेतकऱ्यांचे दारिद्रय सुटता सुटत नाही.मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना घोंगावत असलेल्या संकटावर मात करणे गरजेचे झाले आहे.परंपरागत शेती,कष्ट करूनही शेतकऱ्यांची माती होत आहे.आज वाढलेले प्रदुषण,हवामानात झालेला बदल थांबला नाही तर अनेक देशांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी जंगलतोड थांबवून मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे झाले आहे.बदलत्या परिस्थिती बरोबरच ऑक्सिजनची कमतरता मानवाचे आयुष्य नऊ वर्षांनी कमी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन,डिझेल पेट्रोल,कोळसा यावर प्रतिबंध घालण्यासाठी अख्खे जग पुढे आले आहे. शेतकऱ्यांनी शेती पिकांचे उत्पादन घेण्यासाठी विकेल ते पिकेल या सिद्धांतावर वाटचाल करण्यासाठी बांबू लागवड हा नवीन पर्याय शेतकऱ्यांना सार्थक व हितेशी ठरू शकते म्हणून यासाठी आता शेतकऱ्यांनी पुढे यावे. अशाप्रकारे अनेक उदाहरणे शेतकरी चळवळीचे नेते पाशा पटेल यांनी देऊन शेतकऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
अनेक संत महात्म्यांनी वृक्षांची गरज आपल्या प्रबोधनातून जपली.मात्र वाढत्या गरजा व वाढती लोकसंख्या यामुळे झालेल्या वृक्ष शोषणाचा परिणाम आज जगाच्या पाठीवर दिसून येत आहे.कधी दुष्काळ,कधी अतिवृष्टी तर कधी नापिकी, अशाप्रकारे अनंत संकटातून बळीराजा उभा राहतो.कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीने मानव जातीला कशाची गरज आहे हे निसर्गाने या परिस्थितीतून दाखवून दिले.यामुळे आज सावध होऊन पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आली आहे.अशाप्रकारे आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांच्या दुखण्यावर फुंकर घालत आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थित शेतकऱ्यांची मने जिंकली.
बांबूपासून कसा बदल घडू शकतो याचे सादरीकरण केले.बांबू पासून निर्मित वस्तु दाखवत बांबूचे महत्व,भविष्याची गरज ओळखा असे आवाहन बांबू रिचर्च सेंटरचे संजीव करपे यांनी केले.रोजगार हमी योजनेतील अटी शिथील करून शेतकऱ्यांच्या फळबाग वुक्षलागवड बांबू लागवड या कार्यक्रमासाठी रो,ह,यो १० हेक्टरपर्यंत मर्यादा करण्याची तसेच अटल बांबू मिशन नॅशनल बांबू अभियान कार्यक्रमत चंद्रपूर,यवतमाळ जिल्ह्यासाठी राबवण्याची मागणी माजी आमदार अॕड. संजय धोटे,सैय्यद आबीद अली यांनी यानिमित्ताने विचार मांडताना केली. यावेळी कृषी उपसंचालक मनोरे,राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,जिल्हा कृषी अधिक्षक भराडे,सवंर्ग विकास अधिकारी पाचपाटील,तालुका कृषी अधिकारी डमाले यांच्यासह गोंडपिपरी,वणी,कोरपना,राजूरा, जिवती येथील शेतकर्यांनी मोठ्यासंख्यने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण काकडे तर आभार सुहेल अली यांनी व्यक्त केले. राकाँ राजूरा विधानसभा प्रमुख माजी जि. प.सभापती अरूण निमजे,न.प.उपाध्यक्ष शरद जोगी,अजहर शेख,शंकर ठावरी,अॕड. श्रीनिवास मुसळे, नगरसेवक सैय्यद सुहेल अली,इरफान शेख, इम्रान कुरेशी इतरांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.