रमेश निषाद
बल्लारपूर:- जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात जादूटोण्याच्या संशयावरून सात जणांना भर चौकात हात-पाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. यात वयोवृद्ध गटातील महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे. ही संतापजनक घटना दुर्गम समजल्या जाणार्या जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक येथे घडली. ही घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे असे मत वंचितचे नेते राजू झोडे यांनी व्यक्त केले. News 34
२१ व्या शतकात आजही समाज अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.नरबळीचा प्रयत्न, अंधश्रद्धेतून लोकांना सामूहिक मारहाण असेही प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडत आहेत. जग एकीकडे विज्ञानवादाकडे जात असताना पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अशाप्रकारे घटना घडत असतील तर याला जबाबदार शासन व प्रशासन तसेच राजकीय महत्त्वकांक्षी नेते आहेत असा आरोप राजू झोडे यांनी केला. अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात शासन व प्रशासनाने विशेष लक्ष देऊन येथील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. लोकांच्या मनातून अंधश्रद्धा व जातीय द्वेष भावना गेली तरच अशा प्रकारच्या घटना रोखल्या जाऊन निष्पाप लोकांचा बळी जाणे बंद होईल. यासाठी शासन व प्रशासनाने तात्काळ जनतेचे प्रबोधन करावे व जातीय द्वेष भावना दूर होईल याकरिता प्रयत्न करावे अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलतांना राजु झोडे यांनी केली.
सदर घटनेमध्ये जे काही दोषी असतील त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी व यापुढे अशा घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशीही मागणी वंचितचे नेते राजू झोडे यांनी केली.