मूल - जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींचे वीज देयक थकित आहे. ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे वीज देयकाचा भरणा करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, किंवा विज महावितरण कंपनीला वीज जोडणी खंडित करू नये, असे आदेश निर्गमित करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केली आहे.
मागील दीड-दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या सावटात सापडले. लोकांचे रोजगार हिरावल्या गेले. अद्याप नागरिकांची विस्कटलेली आर्थिक घडी बसली नाही. कुटुंबांचा गाडाच योग्यरित्या चालवितांना सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. त्यामुळे दिवाबत्ती करू अनेकांनी ग्राम पंचायतींकडे भरले नाही. त्यामुळे ग्राम पंचायतींकडे लाखो रूपयाचे वीज देयक थकित आहे. नागरिकांनी दिवाबत्ती, पाणी कराचा भरणाचा केला नसल्याने ग्राम पंचायतींची तिजोरी रिकामी आहे. त्यमुळे वीज देयकांचा भरणा करण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासनाला अडचण निर्माण होत आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या आर्थिक बजेटही अर्ध्यावर आला आहे. त्यामुळे या वीज देयकांचा भरणा करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीची अडचण आहे. तर, दुसरीकडे वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतींची वीज जोडणी खंडित करण्याची धडक मोहिम सुरू केली आहे. वीज कंपनीला वीज पुरवठा खंडित करू नये, अशी विनवणी केल्यानंतरही वीज वितरण कंपनी ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. वीज पुरवठा खंडित केल्याने जिल्ह्यातील अनेक गावखेड्यांत अंधार पसरला आहे. ग्राम पंचायतींचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे आदेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले. मात्र, पालकमंत्र्यांच्या आदेशाला वीज वितरण कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असून, जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. शिवाय गावखेड्यात रात्रीच्या सुमारास साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी रस्त्यावर येतात. त्यामुळे या प्राण्यांपासून गावखेड्यातील नागरिकांना धोका पोहचू शकतो. त्यामुळे ग्राम पंचायतींचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित करू नये, वीज देयकाचा भरणा करण्यासाठी शासनाने त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, ग्राम पंचायतींचे वीज देयक माफ करावे, किंवा वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतींचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री, पालकमंत्र्यांनी द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन दिले आहे.
