राजुरा - राजुरा तालुक्यातील नलफडी या गावाजवळून वाहणार्या ओढ्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चे उत्खनन सुरू असून पहाटे पाच वाजेपासून रात्री उशिरा पर्यंत ही ट्रॅक्टर द्वारे वाळू ची वाहतुक सुरू आहे. महसूल विभागाच्या फिरत्या पथकाने सर्व काही माहीत असून एकदाही या वाहतुकदारांवर कार्यवाही करण्यात केलेली नाही. Sand mafia in rajura
या गावात शेतीकडे जाणार्या रस्त्यावर रेतीचे ट्रॅक्टर चालत असल्याने हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. मात्र गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता हे अवैध रेती उत्खनन सुरू आहे. सध्या राजुरा तालुक्यातील अनेक नाल्यात पावसामुळे चांगल्या प्रतीची वाळू वाहून आली आहे. या रेती घाटांना उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र सध्या राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हे रेती उत्खनन सुरू आहे. ही वाळू चोरी थांबविण्यासाठी महसूल विभागाचे एक पथक आहे. मात्र ही चोरी खुलेआम सुरू असतांना त्यांनी या वाळू चोरांवर अद्यापही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या वाळू चोरांची हिंमत चांगलीच वाढली आहे. News 34 chandrapur
नलफडी येथील गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथील नाल्यात रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. राजुरा येथील अनेक रेती चोरी करणारे अक्षरशः हैदोस घालत आहेत. या नाल्यात आतापासून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मात्र शासकीय संपत्तीची व महसूल यांची लूट होत असतांना आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना महसूल विभाग व त्यांचे फिरते पथक काहीही कार्यवाही करीत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे सकाळी 5 ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही वाळूची लूट सुरू असते. गावातील काही पदाधिकाऱ्यांना मॅनेज करून हे लोक आपला कार्यभाग साधत असल्याची माहिती मिळाली. गावकऱ्यांना हे लोक धमक्या द्यायला कमी करीत नसल्याने महसूल विभाग काही कार्यवाही करणार काय, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.