चंद्रपूर/जिवती - पुरोगामी महाराष्ट्रात आजही दुर्गम भागात अफवा व जादू टोण्यावर नागरिक अंध विश्वास करतात, मात्र या अंधविश्वासाला बळी गेल्याने अनेक नागरिकांना त्रास देण्याचे काम अंधविश्वासू नागरिकांनी केलं आहे व करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पहाडी भागातील दुर्गम भाग म्हणजे जिवती गाव, या गावातील वणी खुर्द भागात शनिवारी माणुसकीला कलंकित करणारी घटना समोर आली आहे.
गावातील काही कुटुंब जादूटोणा करतात असा संशय नागरिकांना होता, मोहरम च्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असे सांगितले व लगेच गावकऱ्यांनी कसलाही विचार न करता त्या कुटुंबियातील सदस्यांना बांधून मारहाण केली.
इतकेच नव्हे तर त्या सर्वांना भर चौकात लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारझोड केली,
या मारहाणीत 7 जण जखमी झाले आहे ज्यामध्ये शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी वेळीच गावात धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. News34
पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी आरोपीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत 13 आरोपींना अटक केली असून गावात सध्या अनिस च्या कार्यकर्त्यांनी पोहचून गावकऱ्यांचे समुपदेशन करणे सुरू केले आहे.
घटनेचा पुढील तपास सुरू आहे, पोलीस निरीक्षक अंबिके यांनी अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.