"आशियाना अनाथ आश्रम" येथे राष्ट्रवादी कांग्रेसने साजरा केला रक्षा बंधन
चंद्रपूर :- आज दि.२२/८/२०२१ ला रक्षाबंधनाच्या निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे आशियाना अनाथ आश्रम येते रक्षाबंधन साजरा करण्यात आला. तेथील अनाथ मुलांना राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला आणि येथिल अनाथ मुलीनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा कार्यकर्त्यांना राखी बांधल्या, यावेळी तेथील उपस्थित मुलांना भेट वस्तू देण्यात आले त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहर अध्यक्ष वैष्णवीताई देवतळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राम इंगळे, विपीन लभाने, केतन जोरगेवार, पियूष भोगेकर, आदित्य निखुरे, तृप्ती बोरीकर, साक्षी डावरे, साक्षी नरुले, साहिल दागमवार, तुषार ठाकूर, तेजस पडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
चंद्रपूर: भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणि बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन च्या सदस्यांनी प्राचीन वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली.सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची खात्री करून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा संस्थेचे सदस्य भूषण सोनकुसरे यांनी यावेळी व्यक्त केला .वृक्ष रक्षाबंधनासाठी व पर्यावरणाला हानीकारक असणार्यां घटकांना वगळुन स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर करुन वृक्ष रक्षाबंधन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर ,भूषण सोनकुसरे, रश्मी कोटकर, ज्योत्स्ना गौरकार, तृप्ती गौरकार, सुरज हजारे, सुरज नवले व रिदम कोटकर व इतर सदस्य उपस्थित होते.
अभाविप वरोरा शाखे तर्फे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
वरोरा:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील नव्हे तर जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते. विविध आंदोलन, शिबीर, व सामाजिक उपक्रम अभाविप नेहमी करत असते. त्यांचा एक भाग म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून अभाविपच्या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रम घेतला जातो. बहीण - भावाचं नातं जोपासणारा सण साजरा करत असतो. तो सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या माध्यमातून अभाविपच्या कार्यकर्त्या अहोरात्र देशासाठी काम करणाऱ्या पोलिस बांधवांना पोलीस कर्मचाऱ्यांना व नेहमी वर्षभर प्रवाशांना नेहमी सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार बांधवांना,बस चालकांना व कंडक्टर यांना राख्या बांधण्याचा कार्यक्रम दरवर्षी घेत असते. या वर्षी सुद्धा अभाविपच्या माध्यमातून पोलीस स्टेशन वरोरा व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोरा आगारात अश्या दोन ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला व सर्वं पोलीस बांधवांना कर्मचाऱ्यांना, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोरा आगाराच्या सर्वं अधिकारी,कर्मचाऱ्यांना, बस चालकांना , कंडक्टर ला ओवाळून राख्या बांधण्यात आल्या व सर्वांना मिठाईचे वाटप करून रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आल्या अश्या प्रकारे आपुलकीची भावना व्यक्त करत अभाविप च्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. या वेळी पोलीस बांधवा सोबत काही विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोना चे सर्व नियम पार पाडत. मास्कचा, आणि सॅनिटायझर वापर करून हे कार्यक्रम यशस्वी पणे व उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभाविप जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षिणे, नगरमंत्री छकुली पोटे, नगरसह मंत्री नाझीया पठाण, विद्यार्थिनी प्रमुख तृप्ती गिरसावळे, कोष प्रमुख सानिया पठाण, निधी राखुंडे, पूजा येरगुडे, छकुली गेडाम, मयुरी येटे, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, अंकित मोगरे, रवी शर्मा, अथर्व कष्टी, आदी अभाविप कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अनाथाश्रमातील मुलांसोबत ग्रामदुत फाऊंडेशनचे रक्षाबंधन
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
बहीण भावाच्या नात्याला घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.याच पार्श्वभूमीवर समाजातील उपेक्षित व अनाथ बालकांच्या चेहर्यावर आनंदी हास्य फुलावे,या उदात्त भावनेवून "ग्रामदुत फाऊंडेशन" ने या चिमुकल्यांसोबत रक्षाबंधनाचा सामाजीक सण साजरा केला.राजूरा येथील स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील मुलांसोबत संचालिका निशा चटप यांनी रक्षाबंधन उत्सव साजरा करून सामाजिक बंधुभाव जपला.नांदा ग्रामदुत फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर चटप यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम राबविण्यात आला. अनाथाश्रमातील मुलांसोबत प्रेम, बंधुभावाचे नाते दृढ करून त्यांना भविष्यात सन्मानाने जगता यावे,यासाठी त्यांचे पाठीराखे म्हणून आपल्याला योगदान देता यावे.ही प्रांजळ भुमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या निमीत्ताने ओवाळणी करून बंधुभाव जपणारी राखी, संचालिका चटप यांनी येथील मुलांना बांधली. तसेच फळवाटप करण्यात आले.या सोहळ्याने भारावून चिमुकल्यांनी आनंद व्यक्त केला असून सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी भाऊराव बोबडे,अॕड.दीपक चटप, सुरज गव्हाने,अमोल वाघाडे यांची प्रमुखाने उपस्थिती होती.
निमकर जोपासत आहे नात्या पलिकडचा ऋणानुबंध
१८ वर्षांपासून आदिवासी बहिणींकडून रक्षाबंधन; खडकी व हिरापूर गावात आनंदोत्सव
राजुरा : रक्षाबंधन हे बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण, नात्याला बंधन नसते, रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन जोपासले जाते ते खरे नाते असते असंच नातं माजी आमदार सुदर्शन निमकर हे मागील अठरा वर्षांपासून आदिवासी बहिनींसोबत निभवत आहे.
निमकर हे 2003 मध्ये आमदार असतांना रक्षाबंधनाच्या दिवशीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवती तालुक्यातील आदिवासी खडकी व हिरापूर या गावांत गेले असता या दोन्ही गावतील आदिवासी भगिनींनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते जोपासत कोणतीही पूर्वतयारी नसतांना खडकी येथील गोदाबाई भीमराव मडावी व हिरापूर येथील अंजनाबाई जंगु सोयाम यांनी निमकरांना राख्या बांधल्या. तेंव्हापासून निमकर हे सख्या बहिणीसारखं नातं जोपासत 18 वर्षांपासून अविरतपणे आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन आदिवासी भगिनीकडून राख्या बांधून त्यांना साळी चोळी भेट देऊन अभिनंदन करतात. यानिमित्तानं दोन्ही गावात बहीण भावाच्या ऋणानुबंधाच वातावरण निर्माण होऊन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात सर्व महिला भगिनी व बांधव तसेच बालगोपाल सहभागी होत असल्यामुळे उत्सवाचं वातावरण निर्माण होत असते.
यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे सोबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, विमाशी संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एस. बी. चंदंनखेडे, भोक्सापूर ग्रा. पं.चे उपसरपंच गोविंद मिटपल्ले, खडकी चे माजी सरपंच भीमराव पाटील मडावी वयोवृद्ध प्रतिष्ठित मारू पाटील गेडाम, सुभाष राठोड, नारायण जाधव, इमाम खान पठाण, जंगु पाटील सोयाम, पंढरी सलगर, तिरुपती पोले, पाटण येथील प्रभाकर पा. उईके, जयदेव आत्राम महाराज, सचिन उत्तरवार, सलमान खान पठाण सह मोठ्यासंख्येने नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी खडकी येथील वयोवृद्ध आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक मारू पा. गेडाम यांचा माजी आमदार निमकर यांनी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दुर्गापूर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला
चंद्रपूर, ता. २२ : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांच्या वतीने दुर्गापूर पोलिस स्टेशन मधील पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. भाजपा महिला महामंत्री प्रज्ञाताई बोरगमवार, भाजपा महिला उपाध्यक्ष मंजुश्री कासनगोट्टूवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे पार पडला. यावेळी पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली. यावेळी भाजपा महिला आघाडी महानगर महामंत्री सौ. प्रज्ञा बोरगमवार, महिला आघाडी महानगर उपाध्यक्ष सौ. मंजुश्री कासनगोटटूवार, भाजपा महिला आघाडी तूकुम मंडळ महामंत्री सौ. सुरेखा बोंडे, सचिव सिंधुताई चौधरी, उपाध्यक्ष मालतीताई लांडे, उपाध्यक्ष सीमा मडावी, गिताताई गेडाम, वर्षाताई सुरांगळीकर, कोपरे ताई, वांधरे ताई, पेचे ताई , संगीता शेरकुरे, घडीवर ताई, बुरान ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
बहीणभावाच्या मनातील प्रेम भावना जपणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव आहे. कोरोना काळात आपण जे कार्य करत आहेत, त्याची परतफेड करता येणार नाही, परंतु या बहिणींच्या रक्षाबंधनाने आपले कर्तव्य बजाविण्यात नक्कीच अधिक बळ मिळेल, म्हणून भारतीय जनता महिला आघाडी तर्फे हा एक छोटासा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन महामंत्री प्रज्ञा बोरगमवार यांनी केले.