जिवती- जादूटोण्याच्या संशयावरून अमानुष मारहाणीच्या घटनेची त्वरित दखल घेऊन पोलीस विभाग व अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिवती तालुक्यातील वणी गावात प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला व गावकऱ्यांचे जादूटोणा, भूत, भानामती, तंत्र-मंत्र, करणी, देवी अंगात येणे, बुवाबाजी, जादूटोणा विरोधी कायदा आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह प्रभावीरीत्या प्रबोधन केले. तसेच गावात जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती पत्रके वितरित करण्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश देणारी चित्रप्रदर्शनी सुद्धा लावण्यात आली.
अंधश्रद्ध मानसिकतेतून घडलेल्या सदर घटनेची परिसरात पूनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा घटना का घडतात, त्यामागची मनोसामाजिक कारणे आणि उपायांसह अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि जादूटोणा भूत, भानामती, करणी या अस्तित्वहीन बाबी असून अशा अंधश्रध्दांच्या व मांत्रिकांच्या प्रभावात न येता गावातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले. News 34
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनीही खुळचट अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कायदा हातात न घेता विवेकबुद्धीने शांततामय जीवन जगण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक संतोष अंबिके, पंचायत समिती उपसभापती महेश देवकते, माजी उपसभापती व सामाजिक कार्यकर्ते सुग्रिव गोतावळे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
चोख पोलिस बंदोबस्त व तणावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या सदर प्रबोधन कार्यक्रमात गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अतिशय संवेदनशील व महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.