ताजी बातमी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख ८ ऑगस्ट अशी जाहीर करण्यात आली होती.
राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करून शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे. २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होत आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली होती. मात्र, राज्यातील पूरपरिस्थी लक्षात घेऊन या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, 12 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल. #news34
दरम्यान, यापूर्वीही ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.