कोरपना ता.प्र.सै.मुम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील जोगाई पहाडांच्या पायथ्याशी ऐतिहासिक बुद्धभूमी असलेल्या सर्व्हे नंबर १९२ मधील ५ एकर जमीन सदर बुद्धभूमीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी द्यावी अशी मागणी गडचांदूर न.प.नगरसेवक तथा आरोग्य, स्वच्छता सभापती तथा भीमसेन बहुउद्देशीय सुधार संस्था अध्यक्ष राहुल उमरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुरातत्त्व विभागाकडे स.नं.१९२ मध्ये बुद्धभूमीचे अवशेष असल्याची नोंद आहे मात्र याकडे खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे.याठिकाणच्या पुरातन वास्तू,विहारे,मंदिरांचे जतन आणि संरक्षणासाठी विहाराचे अवशेष असलेली ५ एकर जमीन संस्थेला उपलब्ध करून देण्यासंदर्भात सदर संस्थेने महसूल विभागाकडे विनंती अर्ज केली असता स.नं.१९२ चा सातबारा,नमुना ८ आणि नकशावरून उपरोक्त जमीन महसूल विभागाची असल्याचे निदर्शनास येते.परंतु वनविभागाने सदर स.नं.ची जमीन वनविभागाच्या कक्ष क्रं.३ चा भाग असल्याने व सदर जागा या क्षेत्राचा वनोत्तर वाटप केल्यास वन संवर्धन अधिनियम १८० आकृष्ट होत असल्याने सदर जागा संस्थेला देता येत नाही असे तलाठी यांनी कळविले.मात्र सदर स.नं.मधील २ हेक्टर जमीन शेतीसाठी देण्यात आल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
बुध्दभूमीत भग्नावस्थेत पडलेल्या काही मुर्त्या लोकांनी नेले.जर असाच प्रकार पुढेही सुरू राहिले तर बुद्धभूमीचे ऐतिहासिक महत्त्व आणि अवशेष शिल्लक राहणार नाही आशी खंत व्यक्त होत आहे.सदर संस्था मागील अंदाजे ६ वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात लोकोपयोगी कार्य करीत असून संविधान सन्मान रॅली,जनजागृती,महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी,रक्तदान शिबीर,वन संवर्धनाचे कार्य,वृक्षारोपण असे कार्यक्रम सातत्याने राबवित आहे.पुरातन विहार,मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सदर संस्थेला ५ एकर जमीन देण्यात यावी अशी मागणी वजा विनंती उमरे यांनी निवेदनातून केली आहे.आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिल्याची माहिती आहे.
