चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र अंधारी प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. निबिड जंगलाचा शेजार लाभलेल्या या जंगलात वन्य जिवांशी माणसांचा होणारा संघर्ष नवा नाही. जिल्ह्यात रोजच अशा घटना घडत असतात. मात्र १५ दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनंतर एक आई नऊ महिने पोटात वाढविलेल्या अपत्यासाठी कशी रणरागिणी होते याची साक्ष पटल्याशिवाय रहात नाही.
जुनोना येथे बिबट्याच्या जबड्यात अडकलेल्या आपल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीसाठी रणरागिणी झालेल्या या मातेने चक्क बिबट्याला माघार घेण्यास भाग पाडले. एकदा नाही तर दोन वेळा या वाघाने मुलीला अक्षरश: मृत्यूची झडप मारत आपल्या विशाल जबड्यात पकडून ठेवले होते. या चिमुकलीचा संपूर्ण चेहरा वाघाच्या जबड्यात अडकला होता. वेदेनेने विव्हळणाऱ्या आपल्या मुलीला वाचविण्यासाठी ही माता आपल्या जीवाचीही पर्वा न करता त्या बिबट्यावर तुटून पडली आणि पाहता पाहता वाघाने चार पावले मागे टाकत मातेचा अवतार पाहून तोंडाशी आलेली चिमुकली मुलगी तशीच बाजूला ठेवून जंगलाच्या दिशेने पळ काढला.
अर्चना संदिप मेश्राम असे या २७ वर्षीय मातेचे नाव आहे. अर्चना यांची अवघ्या पाच वर्षांची मुलगी प्राजक्ता ही केवळ नशिब बलवत्तर होते, म्हणून वाचली नाही तर वेळीच तिची आई बिबट्यावर तुटून पडल्याने मृत्यूच्य दाढेतून सहीसलामत सुटली. चंद्रपूर पासून अवघ्या सात किलोमिटर अंतरावरील जुनोना येथे १ जुलैला हा चित्तथरारक प्रसंग घडला.
दुपारी एकच्या सुमारास अर्चना या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहात गेल्या. आपली मुलगी पाठीमागे येत आहे, याची पुसटशीही कल्पना अर्चना यांना नव्हती. त्या बाथरुममध्ये असतानाच अर्चना यांना मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्या लगेच धावत बाहेर आल्या असता त्यांना धक्काच बसला. मुलगी प्राजक्ताला बिबट दोन जबड्यांमध्ये पकडून जंगलाच्या दिशेने खेचून नेत होता. अर्चना यांनी बराच आरडाओरडा केला. मात्र त्यांचा आवाज कोणाच्याही कानी पडत नव्हता. अखेर त्यांनी शेजारी पडलेला बांबू उचलला आणि त्या थेट बिबट्याच्या अंगावर पाठीमारून तुटून पडल्या. बिबट्याच्या शेपटीवर प्रहार करीत त्यांनी मुलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडविले. मात्र तोवर बिबट अर्चना यांच्या डोळ्यांत आग ओकणाऱ्या त्वेषाने पहात होता. त्याने परत प्राजक्ताला जबड्यात धरले. तरीही अर्चना यांनी आपला प्रहार थांबविला नाही. अखेर बिबट्याने तोंडाशी आलेला घास तसाच टाकून जंगलाच्या दिशेने पोबारा केला.
वाघाच्या या जबड्यामुळे जबर जखमी झालेल्या प्राजक्ताच्या चेहऱ्यावरील दुखापत झाली आहे.