चंद्रपूर - दिनांक 3 जुलै २०२१ ला चंद्रपूर येथे शासकिय व खाजगी क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन ' डॉक्टर्स डे ' च्या निमित्ताने 'कोरोना महामारी व आजची आरोग्य व्यवस्था' या विषयावर चिंतन केले. या चर्चेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉ शशिकांत शंभरकर ,चंद्रपूर जिल्हा कोविड रुग्णालयाचे नोडल ऑफिसर डॉ बंडू रामटेके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ संदीप गेडाम, निमा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ राजू ताटेवार तसेच बालरोग तज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉ् अभिलाषा गावतुरे यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सर्व नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमात उपस्थित होते.
त्यानिमित्ताने अस्तिवात असलेल्या आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय केडर 'इंडियन मेडिकल सर्विसेस' ची गरज आहे . जोपर्यंत निर्णय प्रक्रियेत केंद्रापासून प्राथमिक आरोग्य केंद्र पातळी पर्यंत डॉक्टराचे कॅडर असणार नाही तोपर्यंत जनतेचे आरोग्य संबंधी प्रश्नांना न्याय मिळणार नाही असे डॉ शशिकांत शंभरकर म्हणाले. आय एम एस स्वातंत्र्याआधी अस्तित्वात होते. डॉ राजू ताटेवार यांनी आपल्या चर्चेत पदवीधर मतदार संघ ,शिक्षक मतदार संघ प्रमाणे डॉक्टरांचे स्वतंत्र मतदार संघ असणे किती गरजेचे आहे हे बोलून दाखवले .आज सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात डॉक्टरांच्या स्वतःच्या समस्या आहेत तसेच जनतेच्या पण अनेक समस्या आहेत . कोरोना महामारी च्या काळातील सत्ताधाऱ्यांच्या अत्यंत बेजबाबदार भूमिकेने संपूर्ण देशाला अगणित समस्यांच्या खाईत लोटले आहे. विधानसभेत व परिषदेत डॉक्टर म्हणून आमचे प्रतिनिधी असतील तर आरोग्याच्या निगडित समस्येला समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी दिला. बालरोगत्ज्ञ डॉ अभिलाषा बेहेरे- गावतुरे म्हणाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांना जनतेच्या आरोग्याचे निर्णय घेण्याचा अधिकार 73 व्या घटना दुरुस्तीत देण्यात आला, पण 25 वर्षानंतर ही जनतेच्या आरोग्यासाठी काही ठोस पावले जिल्हा परिषद व महानगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था उचलताना दिसत नाही. त्याचे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकं डॉक्टर नसतात, आरोग्याच्या विवीध विषयाची माहिती नसते आणि त्यांना या विषयाचे गांभीर्य वाटेल हे आवश्यक नाही.
आरोग्य हे क्षेत्र त्यात निपुण असलेल्या लोकांकडे दिले तर व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राला योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतलेला मनुष्यबळ तसेच नवीन तंत्रज्ञानाची साथ लाभली तर कष्टकरी कामकरी शेतकरी वर्गाला न्याय मिळू शकतो . त्यासाठी आयएएस , आयपीएस सारखेच ' आयएमएस ' गरज आहे. शहरी भागात सुद्धा कोविड व अन्य साथीच्या आजाराला हाताळण्यास चंद्रपूर महानगरपालिका सारखी स्थानिक स्वराज्य संस्था पूर्णपणे अपयशी ठरली याबद्दल रोष व्यक्त केले . डॉ किरण वानखेडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात आउटसोर्सिंग मुळे आरोग्याची गुणवत्ता व स्थिरता कशी धोक्यात आली हे पटवून दिले . डॉ राकेश गावतुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना म्हणाले की समाजातील उच्च शिक्षित वर्गाने 'डॉक्टर डे 'ला उत्सव म्हणून साजरा न करता 'चिंतन दिवस' म्हणून साजरा केल्यास नक्कीच समाजाला आणि डॉक्टर बांधवांना एक नवीन दिशा मिळेल. कार्यक्रमाचे संचालन डॉ दीपक जोगदंड यांनी केले तसेच आभार डॉ वीरेंद्र भावे यांनी केली .कोवीड चे सर्व नियम पाळून शासकीय व खाजगी डॉक्टरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


