रमेश निषाद
ब्रह्मपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे तसेच त्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे या मागणी करीता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील असंख्य आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकरी पिढ्यानपिढ्या आपल्या जमिनी कसत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शेत जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे याकरिता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दावे सुद्धा टाकलेले आहेत. वन हक्क कायद्यानुसार जंगल लागत आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी शेत जमीन २००५ पूर्वीपासून कसत असल्यास त्यांना शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे असा नियम आहे. तरीसुद्धा शासन व वन विभागाचे अधिकारी वन हक्क कायद्याची पायमल्ली करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असतात. वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी शेतकऱ्यांना धमकावणे, मारझोड करणे, शेत पिकांची नुकसान करणे व शेतीपासून वंचित ठेवणे असा प्रकार करत आहेत. जिल्हाधिकारी यांचे पत्र असून सुद्धा वन विभागाचे कर्मचारी प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे तात्काळ जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशा विविध मूलभूत मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी द्वारा ब्रह्मपुरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत धरणे आंदोलन केले.
धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी वन विभागाच्या व प्रशासनाच्या विरोधात तीव्र नारेबाजी व आक्रोश व्यक्त केला. जर शेत जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले नाही तर वंचित बहुजन आघाडी द्वारा जिल्हा कार्यालयासमोर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन हल्ला-बोल आंदोलन करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी शासन व प्रशासनाला दिला.
धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, सुभाष थोरात, प्रेमलाल मेश्राम, लीलाधर वंजारी, लीलाताई रामटेके, अरुण सुखदेवे, कमलेश मेश्राम, अश्वजीत हुमणे ,तथा असंख्य जबरान जोत शेतकरी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
