कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षांपूर्वी केलेली दारूबंदी नुकतीच हटवण्यात आली.यामुळे मद्यप्रेमींनी एकच जल्लोष साजरा केल्याचे प्रत्यक्ष अनुभवता आले.एका ठिकाणी तर बार मालकाने जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची चक्क आरतीच ओवाळली.मद्यप्रेमी आणि परवाना धारक दारू विक्रेत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.संबंधीत विभागाकडून जुन्या दारू विक्रेत्यांना परवाने नूतनीकरण करून देण्यात आले.याच पार्श्वभूमीवर कोरपना तालुक्यातील औद्यागिक शहर गडचांदूर येथेही जुन्या देशी,विदेशी दारू दुकानांना हीरवी झेंडी मिळताच दुकांनांचे शटर उघडले.गडचांदूरची लोकसंख्या ४० हजाराच्या जवळपास असून सध्या याठिकाणी ४ देशीची दुकाने आणि ११ च्या जवळपास बीअरबार आहे.असे असताना येथे पुन्हा नव्याने ४,५ बीअर बार,बिअर शॉपी व स्थलांतरित देशी दारूची दुकाने येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
न.प.नगराध्यक्षांनी २० जुलै रोजी विशेष सभा बोलवली आहे.या सभेची विषयसुचीत एकुण ५ विषय ठेवण्यात येणार आहे.नंबर(१)"प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मिळालेला राज्य शासनाच्या निधीतून पहिला व दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला.त्यामधून शिल्लक रक्कम रूपये २४ लाख शिल्लक असून उर्वरित हफ्ते वितरीत करण्याबाबत निर्णय घेणे." (२)नगरसेवक विक्रण येरणे यांच्या १६ जुलै रोजी पत्रानुसार येथील ऐतिहासिक बौद्ध भूमी व हनुमान मंदिर(लंगडा मारोती) परिसराचे सौंदर्यकरण,वाचनालय इमारत बांधकाम करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणेबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबत.(३)नगरसेवक विक्रम येरणे यांच्या १६ जुलै रोजी पत्रानुसार येथील ऐतिहासिक बौद्ध भुमी व हनुमान मंदिर(लंगडा मारोती)परिसरात इलेक्ट्रिक पोल व ३ हायमास्ट उभारण्यासाठी विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबत.(४)दिगंबर ब लांजेकर व श्रीमती कलावती मधुकर लांजेकर रा.गडचांदूर यांच्या आदेशानुसार बी बी लांजेवार देशी दारूचे दुकान गडचांदूर न.प.हद्दतील सर्व्हे नं.३६६/१ मालमत्ता क्रं.९८८ च्या इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी न.प.चे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.तरी सदर विषयावर चर्चा विनिमय करून निर्णय घेण्याबाबत.(५)अर्जदार सौ.रिता शरद जोगी रा.वार्ड क्रं.०३(प्रभाग क्रं.४ कोरपना रोड,गडचांदूर शहराच्या हद्दीत बालाजी लॉन जवळ "आदिती वाईनबार व रेस्टारेंट" गडचांदूर या नावाने वाईन बार सुरू करण्यासाठी न.प.चे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.तरी या विषयावर विचार विनिमय करून निर्णय घेणे बाबत.विकासाच्या दृष्टीने नंबर १,२,३ या विषयांबद्दल आक्षेप नसावा.परंतु ४ व ५ या दारू संबंधीच्या विषयांवर विविध पातळीवरून मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याला कारणही तसेच आहे.शहरात नाली सफाई होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे.नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. "आपले कुटुंब,आपली जबाबदारी" ही गोष्ट लक्षात घेऊन नागरिक स्वतः हातात फावडा घेऊन नाली सफाई करीत आहे.आवश्यक विकास कामांची बोंबाबोंब सुरू असताना नगरपरिषद शासनप्रशासन मूकबधिराची भुमीका वठवत असल्याचे चित्र आहे. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडीत माणिकगड सिमेंटच्या डस्ट प्रदूषणाच्या विषयी नगराध्यक्षांनी सभेत ठराव नाही घेतला. मात्र आता नवीन व स्थलांतरित देशी, विदेशी बार व दारू दूकानांसाठी ना-हरकत प्रमाणपत्रा बद्दलचे विषय विशेष सभेत सामावून घेतले,ही बाब कितपत योग्य.अगोदरच शहरात भरमसाठ बिअर बार,देशी दारूची दुकाने असताना पुन्हा जर यात वृद्धि झाली तर भविष्यात शहरात दारुचा महापूर येणार असे मत व्यक्त होत असून "हाच काय तुमच विकास" असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.विकासाच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेकीचे आरोप होत असून एकीकडे दारूमुळे कित्येकांचे संसार देशोधडीला लागत आहे तर दुसरीकडे याठिकाणी नवनवीन दारू दुकानांना येण्याची संधी देण्याचे प्रयत्न सुरू आहे. याठिकाणी नगराध्यक्षा एक महिला असताना दारुमुळे दुसऱ्या महिलेचे जीवन उद्ध्वस्त होताना कसेकाय बघू शकते,ही बाब सुन्न करणारी आहे.याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात असून शेवटी "येतो पब्लिक है,ये सब जानती है" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.शहराच्या हिशोबाने येथे आजपर्यंत झाले तेवढे पुरे.पण यापुढे दारू दुकानांना न.प.ने ना-हरकत प्रमाणपत्र देवू नये,मग ते नवीन असो की स्थलांतरीत असे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.आता याविषयी विरोधी पक्ष नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.