चंद्रपूर/दुर्गापूर - 13 जुलै मंगळवारची सकाळ लष्करे कुटुंबासाठी अंधकारमय ठरली, जनरेटरच्या वायू गळतीमुळे लष्करे कुटुंबातील 6 सदस्य झोपेतच दगावली.
विशेष म्हणजे 45 वर्षीय रमेश लष्करे हे कंत्राटदार म्हणून छोटे मोठे काम करीत असतात, 28 जून ला त्यांचा मोठा मुलगा अजय याचा विवाह माधुरी यांच्यासह झाला.
घरात प्रथम लग्न असल्याने लष्करे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं, 2 आठवडे लष्करे कुटुंबाच्या घरी पाहुण्यांची चांगलीच रेलचेल होती.
अजय याचा विवाह समारोह धुमधडाक्यात पार पडला, रितिरिवाजा प्रमाणे लग्न झाल्यावर 12 जुलै रोजी लष्करे कुटुंबाने माधुरी ला आपल्या दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 मधील घरी आणले.
लष्करे कुटुंबाची सून म्हणून माधुरीचा घरी पहिला दिवस होता.
सायंकाळ होताच जिल्ह्यात पाऊस सुरू झाला, रात्र होताच पावसाचा जोर वाढला, या मुसळधार पावसात परिसरातील रोहित्र शॉर्ट सर्किट झाल्याने बंद पडले व परिसरातील वीज पुरवठा ठप्प झाला.
कुटुंबप्रमुख रमेश लष्करे वीज पुरवठा सुरू होण्याची वाट बघत होते, मात्र 11 वाजल्यानंतरही वीज पुरवठा सुरू झाला नाही, आज आपल्या कुटुंबात नवीन सदस्यांच आगमन झाले मात्र ती अंधारात कशी राहणार म्हणून घरी असलेला जनरेटर रमेश यांनी बाहेर काढला.
जनरेटर जुना असल्याने रमेश यांनी त्याला स्वच्छ करीत बाहेरून पेट्रोल आणले व त्या जनरेटरला सुरू केले.
घरी पुन्हा प्रकाश झाला, दिवसभरात सर्व कुटुंब थकून गेले असल्याने त्यांना लवकर झोप आली.
गाढ झोपेत असताना त्या जनरेटर मधून धूर बाहेर पडायला सुरुवात झाली, घरातील पंख्यानी तो धूर सर्वत्र पसरविला.
लष्करे कुटुंबातील सदस्यांचा नित्यक्रम सकाळी लवकर उठण्याचा होता, मात्र घराचे दार अजून उघडले नसल्याने शेजारील नागरिकांनी लष्करे कुटुंबातील सदस्यांना जागे करण्याचा प्रयत्न करून बघितला मात्र आतून कुणाचा आवाज आला नसल्याने त्यांनी दार तोडले व आतील दृश्य बघताच शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
घरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता सर्व सदस्य बेशुद्धावस्थेत पडले होते, नागरिकांनी सर्वाना बाहेर काढत खाजगी रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी लष्करे कुटुंबातील 6 जणांना मृत घोषित केले.
मृतकांमध्ये रमेश लष्करे वय 44 वर्ष, अजय लष्करे वय 20 वर्ष, लखन लष्करे वय 9 वर्ष, माधुरी लष्करे वय 18 वर्ष, कृष्णा लष्करे वय 08 वर्ष, पूजा लष्करे वय 14 वर्ष असे सहा सदस्यांचा समावेश होता.
सौ.दासू लष्करे वय 40 वर्ष, या गंभीर असून झाडे खाजगी हॉस्पिटल चंद्रपूर येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले.
सासुरवाडीत संसाराचा पहिला दिवस माधुरीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला, सदर घटनेमुळे नागरिक हळहळून गेले.
मृत्यू कधी, कोणत्या क्षणी येणार हे कुणी सांगू शकत नाही, आनंदाचे क्षण हे कधीही दुःखात बदलू शकतात हे या घटनेने उदाहरण दिले आहे.
सदर प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.