राजुरा - राजुरा तालुक्यातील धिडशी या गावी दुपारी घरी कुणी नसल्याची वेळ साधून गावातील एका युवकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र या धाडशी मुलीने जोरदार प्रतिकार केल्याने आणि मोठ्याने ओरडल्याने शेजारी धावून आले. या घटनेत ही मुलगी जखमी झाली आहे. पळून गेलेल्या सचिन रामचंद्र माणूसमारे, वय 29 या आरोपीला राजुरा पोलिसांनी शेजारच्या गावातून अटक केली असून त्याचे विरुद्ध कलम 354, पास्को या कलमानुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
दिनांक 25 जुलै ला धिडशी या गावातील बहुतांश शेतकरी पुरुष व महिला शेतावर गेल्या होत्या. यावेळी गावात सामसूम असल्याचे पाहून दुपारी दोन वाजता येथील सचिन रामचंद्र माणूसमारे, वय 29 हा युवक एका घरी गेला आणि अल्पवयीन मुलगी एकटीच असल्याचे बघून तिच्या घरात जाऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या अल्पवयीन मुलीने जोरदार प्रतिकार करीत मोठ्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकून शेजारचे लोक धावून आले आणि त्यांनी या मुलीला सोडविले. या घटनेत आरोपीने मुलीचा गळा दाबल्याने व मारहाण केल्याने ही अल्पवयीन मुलगी जखमी झाली.
प्रकरणाची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी आरोपीला पळून जातांना शेजारच्या गावातून अटक केली. या गुन्ह्यात आरोपी सचिन रामचंद्र माणूसमारे विरुद्ध विनयभंग व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. राजुरा पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापुर्वी या आरोपीने नांदा येथे जावून एका महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे कुटुंब असून त्यांना हद्दपार करावे, अशी संतप्त गावकऱ्यांची मागणी आहे.
नराधमाच्या कृत्याला त्या अल्पवयीन मुलीने प्रतिकार केल्याने ती त्यामधून बचावली, आज मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, अत्याचार झाला की समाजात महिला संघटन जागे होत निषेध करतात, मात्र त्या मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्याची भाषा कुणी करीत नाही.
महिला संघटनांनी आता मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी शिबिरे आयोजित करावी, जेणेकरून कुणा नराधमाची असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही.