चंद्रपूर - पालिकेतील आमसभेचा गोंधळाच वादळ अजूनही शमले नसताना पालिका उपायुक्त विशाल वाघ यांनी महापौर यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार यांचेवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.
चंद्रपूर मनपाच्या आजच्या गोंधळानंतर अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल व वाघ यांना महापौर राखी कंचर्लावार यांनी आपल्या दालनात बोलाविले होते.
त्यावेळी दालनात स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक देवानंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर, संजय कंचर्लावार , आशा आबोजवार, खुशबु चौधरी, मंगला आखरे, छबुताई वैरागडे उपस्थित होते.
आमसभेपुर्वी काय विषय हाताळायचे यावर चर्चा सुरू असताना नगरसेवक संजय कंचर्लावार हे उपायुक्त वाघ यांचेवर चांगलेच भडकले.
पालिकेच्या बैठकीची माहिती बाहेर जाते कशी, असे म्हणत कोणतेही कारण नसताना अर्वाच्च व अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "तुम्ही बाहेरगावचे आहात सांभाळुन रहा , चारचौघे पाठवुन कोणत्या वार्डात मारुन फेकलं कळणार देखील नाही" असा धमकीवजा इशारा कंचर्लावार यांनी वाघ यांना दिला.
महापौर व उपायुक्त यांच्यात होत असलेल्या या चर्चेच्या मध्ये बोलणे हे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे होय याबाबत उपायुक्त वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या विरोधात तक्रार देत गुन्हा दाखल केला.
मागील काही महिन्यापासून चंद्रपूर मनपा सतत वादग्रस्त कामात प्रसिद्ध होत आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या सर्व प्रकारांवर मौन सोडावे अशी चर्चा पक्षातील नगरसेवकांनी दबक्या आवाजात करीत आहे.

