चंद्रपूर - माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्ष 2015 मध्ये चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित केला होता, 6 वर्षे वनवासात असलेल्या दारू विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर वर्ष 2021 मध्ये हसू फुलले, महाविकास आघाडी सरकार मधील मदत व पुनर्वसन, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याची दारूबंदी उठवली.
जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले अशी भावना दारू विक्रेत्यांच्या मनात आहे.
मागील 3 दिवसात मद्यप्रेमींनी तब्बल 1 कोटींची दारू रिचवल्याची माहिती आहे, याचाच आनंद म्हणून ग्रीन पार्क बार चे मालक गणेश गोरडवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची आरती केली.
जो आमचं पोट भरतो तो आमचा देव आहे, वडेट्टीवार यांनी दारूविक्रेत्यांच्या जीवनात पुन्हा आनंद भरला आहे, त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही अशी प्रतिक्रिया गोरडवार यांनी दिली आहे.