#Chimurnews
चिमूर - कोरोनाच्या काळात गर्दी करू नका असं आवाहन करण्यात येत असलं तरी सामान्य नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुक्ताई धबधबा परिसरात कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली करत पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे.
येथील मुक्ताई धबधबा त्याच्या निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो. रविवारी विकेंडच्या निमित्ताने हा धबधबा पाहण्यासाठी तरुण वर्गाने गर्दी केल्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याखाली हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. बहुतांश पर्यटकांनी मास्क घातलेले नाहीत तसंच सोशल डिस्टन्सिंग न पाळता एकच झुंबड उडवली.
एकिकडे डेल्टा वेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे अशा घटनांमुळे कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
येथील चिमूर व्यापारी संघटनेने या गर्दीवर आवर घालण्याची मागणी केली आहे. गेले दीड वर्षं केवळ गर्दीच्या कारणाने व्यापार ठप्प केला जात असताना या अशा गर्दीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार का, असा सवाल या संघटनेतर्फे विचारण्यात आला आहे.
