वर्धा - कोरोना काळात बँकेला व्यवहार करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे, वर्धा शहरातील सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या समोर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे.
शुक्रवारी अचानक एक व्यक्ती बँकेत अंगाला बॉम्ब लावून आत शिरला.
बॉम्ब बघून नागरिक घाबरून गेले व सैरावैरा पळू लागले. योगेश कुबडे असे त्या सुसाईड बॉम्बरचे नाव, त्याने धमकीपत्र देत तब्बल 55 लाखांची मागणी केली.
बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या इसमाने बँक शिपायाच्या डोक्यावर एअर पिस्तूल लावून धमकी देत पैशांची मागणी केली. पुढे त्याला घेऊन येत पिस्तूल लपवून ठेवली अन् पत्र त्याला दिले. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिले. बँकेच्या व्यवस्थापकांनी तक्रार समजून पत्र वाचले. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्याला धक्काच बसला.
बँकेत येताच बॉम्ब अॅक्टीव्ह केलेला आहे. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नका, अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी लिहिली होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत पोलिसांना सुसाईड बॉम्बर शिरल्याची माहिती दिली.
बँकेत सुसाईड बॉम्बर शिरल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली. पोलिसांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर योगेश कुबडे याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता योगेशला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेले बनावट बॉम्ब सदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केले.
कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाइपच्या कांड्या, वायर, छोटी डिजिटल वॉच जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असे तयार केले होते. त्यात विस्फोटक नव्हते. प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये पीओपी भरले होते. पाहणाऱ्यांना ते बॉम्बसदृष्य दिसत होते. त्याने बनावट पिस्तूल ऑनलाइन बोलावल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
वर्धेच्या सेवाग्रामस्थित बँकेत एकाने बनावट सुसाईड बॉम्बर बनून प्रवेश केला. यानंतर धमकीचे पत्र देऊन पैशांची मागणी केली. आजारावर उपचारासाठी ५५ लाखांची गरज आहे. पैसे न दिल्यास सर्वांना संपवण्याची धमकी पत्रातून दिली होती.
