अकोला - कोरोना काळात लागलेल्या संचारबंदीमुळे सायबर गुन्हेगारांनी फेसबुकच्या माध्यमातून अनेकांना गंडविल्याचे प्रकार समोर आले, आता तर पुरुषांना आकर्षित करून न्यूड व्हिडीओ कॉल करून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यपालन व वर्तमान अकोला जिल्हाधिकारी अधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करीत अनेकांना पैश्याची मागणी करण्यात आली, मात्र पापडकर यांच्या प्रसांगवधानाने ही फसवणूक टळली.
फेसबुकवर अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं 'Jitendra Papalkar' या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. याच नावाने फेसबुकवर एक बनावट अकाऊंट हॅकर्सनी खोललं आहे. काल संध्याकाळनंतर अकोल्यातील काही प्रतिष्ठीत मंडळींना या बनावट अकाऊंटवरून 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठविण्यात आल्यात. अकोल्यातील जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष गादिया, अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचा मुलगा अखिलेश यांच्यासह 12 ते 13 लोकांना अशा रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या आहेत. या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या अकाऊंटवरून मराठीत चॅटींग सुरू करण्यात आलं. आपण सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असून आपल्याला अतिशय तातडीने 12 हजार रुपयांची आवश्यकता आहे. हे पैसे लवकरच परत करणार असल्याचं या चॅटींगमध्ये म्हटलं गेलं. पैसे जमा करण्यासाठी 'गुगल पे' आणि 'पेटीएम'चे अकाऊंट नंबरही देण्यात आलेत. हा फसवणुसीचा प्रकार असल्याचे सर्वांच्याच लक्षात आल्याने कुणीच पैशांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यात कोणतेच आर्थिक व्यवहार झाले नाहीत. मॅसेज आलेल्या सर्वांनीच आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. अन यातूनच पुढील सुत्र वेगानं पुढे हललीत.
