घुग्गुस - कोरोना काळात अनेकांचे वीजबिल भरमसाठ प्रमाणात आले, विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलने केल्यावर वीज बिलाचे हफ्ते महावीतरणतर्फे पाडून देण्यात आले.
मात्र अजूनही महावीतरणची वसुली पूर्णपणे झाली नसल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडल आहे, आता महावितरण वीजबिल वसुली मोहीम राबवित आहे, जे नागरिक वीज बिल भरणार नाही त्यांचं वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सध्या सुरू आहे.
मात्र घुग्गुस शहरात उलट प्रकार घडलेला आहे, शहरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहणारे कामगार कुटुंबांना देयक दिनांक गेल्यावर वीजबिल देण्यात आले.
देयक दिनांक हे 21 जून आहे, मात्र नागरिकांमध्ये ते 26 जूनला वितरित करण्यात आले.
विशेष म्हणजे युनिट कमी आणि वीजबिल 14 ते 15 हजार रुपयांच्या घरात आहे, विजबिलाचे हफ्ते तर पाडण्यात आले मात्र त्यावरील व्याज वसुली करण्याचे काम महावितरण करीत आहे असा आरोप नागरिकांनी महावीतरणवर लावला आहे.
देयक दिनांक गेल्यावर वीजबिल देण्यात आले पण त्यावरील व्याज हे 50 ते 200 रुपये आहे, आधीच हातावर काम करीत पैश्याची जुळवाजुळव करायची व महावितरण देयक दिनांक गेल्यावर वीज बिल देत आहे, ही आम्हा गरीब कुटुंबांची जणू थट्टाच करीत आहे.
वीजबिल वेळेवर न भरल्याने वीज कार्यालयाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी तयार असतात, हा दोष स्वतः विजवीतरण कार्यालयाचा असून तात्काळ वीज कर्मचाऱ्यांनी आमचा प्रश्न सोडवून द्यावा व वीजबिल हे नेहमी देयक दिनांकाच्या आत द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी यासंदर्भात घुग्गुस वीज वितरण कार्यालय गाठले असता ते बंद होते, अधिकारी ढुमणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
