घुग्गुस - वर्धा नदीवरील चिंचोळी घाटावर मागील अनेक महिन्यापासून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल, खनिकर्म व तलाठी यांचं यावर जाणून दुर्लक्ष सुरू आहे.
त्यामुळे अवैध वाळू माफियांची हिंमत वाढली आहे, पोलीस स्टेशनसमोर लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे सध्या शोभेची वास्तू बनली आहे.
1 जून ला रात्री 9 वाजेदरम्यान अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की ते फाटक 2 तुकड्यात ध्वस्त झाले.
सदर रेल्वे फाटक हे घुग्गुस पोलीस स्टेशनच्या बाजूला आहे, मात्र या अवैध वाळू चोरीकडे पोलीस प्रशासन सुद्धा मुकदर्शक पध्दतीने बघत आहे.
काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला होता.
कोरोना काळापासून ही अवैध वाळू तस्करी अविरत सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने पोम्भूर्णा व वरोरा येथे अवैध वाळू तस्करांवर धाडी मारत गुन्हे दाखल केले होते मात्र तशीच कारवाई घुग्गुस मध्ये पण करायला हवी अशी चर्चा शहरात रंगली आहे.
ट्रॅक्टरच्या धडकेत रेल्वे फाटक 2 तुकड्यात ध्वस्त झाले होते काही काळ तिथे वाहतूक विस्कळीत झाली, आता या अवैध वाळू माफियांवर रेल्वे विभाग, पोलीस प्रशासन की महसूल विभाग कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.