#chandrapurramsetu
चंद्रपूर - दाताळा रोडच्या इरई नदी वरील नवनिर्मित पुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,क्रांतिवीर बाबुराव शेडमाके तसेच रामसेतू नाव देण्याची मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन चंद्रपूरच्या जिल्हाधिकार्यांकडे केलेली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही सर्व निवेदने महानगरपालिकेकडे पाठविण्यात आली. मात्र महानगरपालिकेची हद्द इरई नदीच्या काठापर्यंत असून नवनिर्मित पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलाला नाव देण्याची कार्यवाही करणे शक्य नसल्याचे तिन लेखी पत्र मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी ३ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी यांना पाठविले.
मात्र आयुक्तांनी ज्या पुलाला नाव देण्याचा अधिकार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविले, त्याच पुलाला २३ जून रोजी झालेल्या मनपाच्या आमसभेमध्ये 'रामसेतू' नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. उपमहापौर राहुल पावडे यांनी दिलेल्या लेखी पत्रावरून महापौर राखी कंचर्लावार यांनी आमसभेत या पुलाला 'रामसेतू' नाव देण्याचा विषय ठेवला व त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. या नामकरणा नंतर शहरातील राम भक्तांनी फलक लावून महानगरपालिका व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन सुद्धा केले.
मात्र महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर असलेल्या व सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम केलेल्यांना पुलाचे नामकरण करण्याचा महानगरपालिकेला कोणताही अधिकार नाही याची स्पष्ट जाणीव असतानाही करोडो रुपयांच्या विविध भ्रष्टाचार व घोटाळ्यांनी डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार व उपमहापौर राहुल पावडे यांनी केविलवाणा खटाटोप केल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. आयुक्त राजेश मोहिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेली पत्रे व नामकरणासाठी उपमहापौर राहुल पावडे यांनी दिलेल्या पत्राची प्रत देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोरोना काळात प्रतिमा सुधारण्यासाठी अशाच प्रकारे मनपातील सत्ताधाऱ्यांनी अंतिम संस्काराच्या ओट्याचे निरीक्षण करून एक संगीतबद्ध चित्रफीत वायरल केली होती. पैसा व प्रसिद्धीचा हव्यास लागलेले सत्ताधारी आता प्रतिमा संवर्धनासाठी रामनामाचा उपयोग करून राम भक्तांची दिशाभूल करीत असल्याची टिका सुध्दा देशमुख यांनी केलेली आहे.
