News34
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - शासनाच्या जनसुविधा योजने अंतर्गत बांधकामासाठी प्राप्त झालेल्या निधीची अफरातफर करणा-या दोषीविरूध्द फौजदारी कारवाई करून जबाबदार ग्रामसेवकास पदमुक्त करावे. अशी मागणी नांदगांव ग्राम पंचायतीच्या सरपंचा हिमानी वाकुडकर यांनी केल्याने ग्राम पंचायतीच्या तत्कालीन पदाधिका-यांचे धाबे दणाणले आहे. पंचायत समिती मूल अंतर्गत ग्राम पंचायत नांदगांव येथे सन २०२०-२१ या वित्त वर्षात शासनाचे जनसुविधा योजने अंतर्गत नवीन ग्राम पंचायत भवन व स्मशानभुमी बांधकामा करीता ३० लाख रूपये प्राप्त झाले. लाखो रूपये खर्चाच्या या बांधकामा करीता आँनलाईन निवीदा प्रक्रिया राबविण्यांत आली. त्यामूळे अनेक इच्छुक कंत्राटदारांनी आँनलाईन निवीदा सादर केल्या. त्यानुसार सदर दोन्ही कामांसाठी योग्य कंत्राटदाराची निवड करून त्यांना काम करण्याचे आदेश देणे आवश्यक होते. परंतू तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार व ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांनी सदर निधी मधून कोणतेही बांधकाम न करता ग्राम पंचायत सदस्यांशी संधान साधून सदर शासकिय निधीमधून २२ लाख ४ हजार ८४६ रूपये ग्राम पंचायत सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येण्याच्या तोंडावर २०२० मधील माहे मे, जुन, जुलै आणि आँगस्ट या चार महिण्याच्या काळात तब्बल १९ वेळा धनादेशावर सेल्फ लिहून काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. झालेल्या या गंभीर प्रकाराची सरपंचा हिमानी वाकुडकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार केली आहे. केलेल्या तक्रारीत सरपंच हिमानी वाकुडकर यांनी मंजुर निधी नुसार काम न करणे, ई टेंडरींग नुसार कंत्राटदाराला काम करण्याचे आदेश न देणे, काम न करता पंचायत समिती प्रशासनाला चुकीची माहिती पुरविणे, शासनाच्या निकषांनुसार बांधकाम न करता मर्जीने बांधकाम करून निधीची परस्पर विल्हेवाट लावणे, योजनेची खोटी माहिती बॅंकेसह पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला देणे, पंचायत समितीच्या पंधरवाडी सभेत ग्राम सेवकाकडून खोटी व दिशाभुल देणारी माहिती सांगणे, आदि प्रकार घडल्याचे नमुद केले आहे. सरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर सदर प्रकार उजेडात येताच सरपंच या नात्याने ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांना जनसुविधा योजनेबाबत माहिती मागवली तेव्हा तब्बल पाच महिणे पर्यंत माहिती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान ग्रामसेवक बावनथडे माहिती देत नसल्याची तक्रार पंचायत समिती मध्यें दाखल केल्यानंतर तब्बल आठवडयाभराने बावनथडे यांनी जनसुविधा योजनेची माहिती पुरविली. प्राप्त झालेल्या जनसुविधा योजनेच्या दस्तऐवजांची पडताळणी केली तेव्हा सदर कामात तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार यांनी ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामसेवक बावनथडे यांचेशी संधान सांधून शासकिय निधीची वाट लावल्याचे दिसून आले. त्यामूळे जनतेच्या कल्याणासाठी प्राप्त झालेल्या शासकिय निधीचा अपहार झाल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याने सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधीता विरूध्द कारवाई करावी व अफरातफर केलेल्या रक्कमेची वसुली करावी. अशी मागणी सरपंच हिमानी वाकुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसह ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीम आणि जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय गायकवाड आणि जिल्हाधिकारी यांचेकडे केल्याने ग्राम पंचायतीच्या तत्कालीन पदाधिका-यांमध्यें खळबळ माजली आहे.
ग्रामसेवक बावनथडे निलंबीत
जनसुविधा योजनेतील गैरव्यवहार, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेकार्ड गहाळ करणे, निधीचा दुरूपयोग आणि अफरातफर केल्याचे कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवर्ग विकास अधिका-याच्या अहवाला वरून ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांना अलीकडेच निलंबीत केले आहे. दरम्यान सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधीता विरूध्द कायदेशीर कारवाई करावी. असे निर्देश पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने येत्या काही दिवसात ग्राम पंचायतीच्या तत्कालीन पदाधिका-यांविरूध्द चौकशीचा ससेमिरा लागेल. अशी चर्चा आहे