गडचिरोली - शेत जमिनीचे फेरफार करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील येवली तालुक्याचे मंडळ अधिकारी यांनी 2 हजार रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने सदर प्रकरण हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिल्याने मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
सर्व्हे नंबर 127/ब शेतजमिनीचे फेरफार करण्यासाठी वाकडी येथील तक्रारदार यांनी येवली येथील मंडळ अधिकारी 57 वर्षीय गिरीधर धानुजी सोनकुसरे यांना दिले मात्र पदाचा दुरुपयोग करीत मंडळ अधिकारी सोनकुसरे यांनी तक्रारदाराला 2 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व मंडळ अधिकाऱ्याची तक्रार केली.
सदर प्रकरणाची पडताळणी झाल्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचला व तडजोडीअंती मंडळ अधिकाऱ्याला 1 हजार रुपये देण्याचे ठरले.
1 हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, सतीश कत्तीवार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.