चंद्रपूर - कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत सुद्धा कोरोना आजाराचा बाजार करीत आहे, कुणी रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार तर काही डॉक्टर्स रुग्णांकडून अवाजवी दर आकारत आहे.
मात्र चंद्रपूर शहरात तर एका डॉक्टरने या काळाबाजाराला वेगळेच वळण दिले आहे.
चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाच्या समोर शफीक क्लिनिक च्या नावाने दवाखाना सुरू केला इतकेच नव्हे तर डॉ. शफीक शेख यांनी कोरोना रुग्णांवर उपचार सुद्धा सुरू केले.
विशेष म्हणजे या क्लिनिकला बॉम्बे नर्सिंग होम ची कुठलीही नोंदणी नाही, ओपीडी व क्लिनिक ची सुद्धा नोंदणी नाही, मात्र या डॉक्टरांनी MBBS व जनरल फिजिशियन असा बोर्ड क्लिनिक समोर लावला आहे, आता त्यांची डिग्री खरी आहे की नाही हे चौकशी अहवालात सामोरे येणारचं.
आज अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व मनपा च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील रुग्णालयाचे अधिकृत तपासणी करण्याकरिता माहिती घेत असताना या अवैध क्लिनिकचा भांडाफोड झाला.
इतकेच नव्हे तर त्यावेळी डॉ. शफीक शेख हे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत होते.
कुठलीही नोंदणी व परवानगी नसतांना असे क्लिनिक जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर सुरू आहे याचा धक्का तर प्रशासनाला चांगलाच लागला.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी तपास सुरू केला असता तिथे अनेक प्रकारच्या औषधी आढळून आल्या, जिल्हा व पोलीस प्रशासनाने सर्व साहित्य जप्त करीत तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे ह्या अवैध क्लिनिक बद्दल पालिका प्रशासनाला माहीत नव्हते का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, कोरोना काळात सुद्धा आता डॉक्टर्स सुद्धा अवैध क्लिनिक सुरू करून या आजाराचा बाजार करण्यात व्यस्त आहे.
