बल्लारपूर/घुग्गुस - जिल्ह्यात अवैध दारू विरोधात चंद्रपूर पोलिसांच्या कारवाईने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
बल्लारपूर पोलिसांना मुख्य मार्गाने दारूचा अवैध साठा येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी नवीन बस स्थानकासमोर नाकाबंदी केली असता एक चारचाकी वाहनाला थांबविले असता त्यामध्ये 124 खोक्यात एकूण 12 हजार 400 देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या.
अवैध देशी दारूची एकूण किंमत 18 लाख 60 हजार असून तस्करी साठी वापरण्यात आलेल्या 12 चक्का ट्रक ची किंमत 20 लाख असा एकूण 38 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी प्रशांत भानुदास दारला, शेख अश्फाक शेख अजीम यांना अटक करण्यात आली असून यामध्ये प्रदीप दारला व करणं निषाद सर्व रा. बल्लारपूर हे दोन आरोपी फरार आहे.
सर्व आरोपीवर महाराष्ट्र दारू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विकास गायकवाड करीत आहे.
दुसऱ्या प्रकरणात घुग्गुस येथे जंगलातील झुडपात देशी दारूविक्री होत असून त्या ठिकाणी दारू साठा लपवून ठेवला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारत देशी दारूचा 40 हजार किंमत असलेला साठा जप्त केला.
यामध्ये आरोपी शेख बाबा उर्फ सोनू शेख मुस्तफा गौश वय 24 याला अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक मानकर, प्रकाश करमे, मनोज धकाते, सचिन डोहे, नितीन मराठे, रवींद्र वाभीटकर, रणजित भुरसे व ज्ञानेश्वर जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.
