गडचिरोली - चंद्रपूरची दारुबंदी सफलतेने उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही दारुबंदी उठवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. चंद्रपूरची दारुबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यातील लोकांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घ्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर वडेट्टीवार यांनी दारुबंदीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागली.
तब्बल 6 वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविल्याने आता गडचिरोली जिल्ह्यातील दारू व्यावसायिकांनी सुद्धा दारूबंदी हटवावी अशी मागणी केली आहे, आता त्या मागणीला राज्य सरकार काय प्रतिसाद देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
