ताजी बातमी - कोरोना विषाणूची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग लहान मुलांनाही होत आहे आणि तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी म्हटलं, कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यासोबतच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाज लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे.
तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्त फोर्स तयार करण्यात येईल. या टास्क फोर्समधील बालरोग तज्ज्ञ हे लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी काम करतील. राज्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. बेड्सची संख्या वाढवण्यात येत आहे. यासोबतच इतर सुविधा वाढवण्यावरही भर दिला जात आहे.
जर तुमच्या घरात लहान मुले असतील, तर तुम्ही आतापासूनच तयारी सुरू करायला पाहिजे. मुलांना मास्क लावण्याची सवय लावा. याशिवाय मुलांना घराबाहेर खेळायला पाठवू नका तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखा. बाहेरचे खाद्यपदार्थही देऊ नका. त्याचबरोबर पौष्टिक आहार खायला द्या. कोरोनाच्या दोन लाटांदरम्यानही मुलांमध्ये संसर्गाचा तितकासा परिणाम झाला नाही. यावरून मुलांमध्ये मजबूत इम्युनिटी सिस्टम असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र ही इम्युनिटी सिस्टम सांभाळणे आवश्यक आहे. मुलांची तब्येत बिघडली वा त्यांच्यामध्ये कोरोनाची संशयित लक्षणे दिसली तर तत्काळ कोरोनाची चाचणी करून घ्या. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा, ताप आल्यास विशेष सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे.