चंद्रपूर - गुरू व शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे.
भारतीय ग्रामीण शिक्षक प्रसारक मंडळाच्या अंतर्गत सण 1972 पासून चंद्रपूर शहरात भवानजी भाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहे मात्र या हायस्कूल मधील इतिहासाचे शिक्षक हितेश मडावी यांनी चक्क शरीरसुखासाठी आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देणे सुरू केले.
इतकेच नव्हे तर होळीच्या दिवशी आदिवासी वसतिगृहात शिक्षक मडावी यांनी चांगलाच धिंगाणा घातला होता, सदर त्रास असह्य झाल्याने त्या विद्यार्थिनीने घडलेला सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला, पीडित मुलीच्या कुटुंबांनी थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी शिक्षक हितेश मडावी यांचेवर विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी समाज कल्याण कार्यालयाद्वारे सुरू करण्यात आलेल्या आदिवासी मुलींचे वसतिगृह येथे राहतात.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्याने या संधीचा फायदा घेत त्या शिक्षकाने गुरू व शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचे काम सुरू केले, त्या विद्यार्थिनीसोबत अश्लील संवाद, फोटो व सतत फोन करून त्यांना मध्यरात्री त्रास देणे सुरू केले होते. जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नापास करण्यात येणार अशी धमकी सुद्धा शिक्षकांनी त्या विद्यार्थिनीला दिली होती.
याबाबत भवानजी भाई हायस्कुल च्या प्राचार्यांनी संचालक व प्रबंधकांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येणार अशी माहिती दिली.
जबाबदार शाळा व्यवस्थापकाने आधी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती मात्र तसे काही झाले नाही, या प्रकरणाबाबत चांगलीच गुप्तता पाळली गेली होती.
मात्र या प्रकारानंतर शाळेची चांगलीच बदनामी झाली असून शिक्षण क्षेत्रात सुद्धा खळबळ माजली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील करीत आहे.
