गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नारंडा-गाडेगाव रोडचे काम मे.पाटील कंस्ट्रक्शन & इंप्राटेक्शन प्रा.लि.पूणे हे करीत असून या कामासाठी लागणारी रवाळी,मुरूम इतर मटेरिअल उत्खननासाठी वनोजा येथील जगदीश पेटकर आणि देवराव पेटकर यांची शेत जमीन स.नं.३४/२ व ३४/३ जिल्हाधिकारी यांनी लीजवर दिल्याचे कळते.मात्र सदर कंत्राटदाराने पेटकर बंधूंच्या जमीनीवरील प्राप्त लीजवर उत्खनन न करता स.नं.३४ या शासकीय जागेवर गेल्या अंदाजे दोन वर्षापासून आजपर्यंत लाखो ब्रास "लाईम स्टोन" चे उत्खनन केल्याचे मोक्यावर स्पष्ट दिसून येत आहे.यामुळे सदर कंत्राटदारांनी शासनाची सपशेल फसवणूक करून लाखोंचा महसूल बुडवल्याचे आरोप होत असून स्थानिक पातळीवरील संबंधित विभाग अधिकारी यापासून अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.वरिष्ठ पातळीवरून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून शासकीय जागेवर सुरू असलेले अवैध उत्खनन तात्काळ थांबवावे तसेच कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून आजपर्यंत बुडालेला संपूर्ण महसूल दंडासह शासनाने वसूल करावा अशी मागणी वजा विनंती गडचांदूर नगरपरिषदेत भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हा खनीकर्म अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली असून खनीकर्म मंत्री सुभाष राजाराम देसाई(म.रा.),आयुक्त खनीकर्म विभाग नागपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी(राजस्व)राजूरा व तहसीलदार कोरपना यांनाही सदर प्रकरणाची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.
नगरसेवक डोहे यांचे मोठे बंधू स्वर्गीय अशोक डोहे कोरपना येथे राहत होते.हे हयात असताना यांनी काही वर्षापूर्वी वनोजा येथील पेटकर बंधूंकडून सदर जमीन खरेदी केली होती.मात्र फेरफार व इतर बाबी पुर्ण होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान पेटकर बंधूंनी सदर जमीनीचे कागदपत्रे तयार करून पाटील कंस्ट्रक्शन पूणे यांना चुनखडी खोदकामासाठी लीज मिळवून दिली.मात्र कंत्राटदारांनी लीजच्या ठिकाणी कमी आणि लगतच्या शासकीय जागेवर मोठ्याप्रमाणात उत्खनन केल्याची गंभीर बाब प्रथमदर्शनी समोर येत आहे.एकुणच लीजच्या नावाखाली शासकीय जागेवर उत्खनन करून सदर कंत्राटदारांनी महसूल बुडवत शासनाच्या तिजोरीला लाखोंचा चुना लावल्याचे निष्पन्न होते.चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक डोहे यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
--------------//----------
सदर प्रकरणी पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजर सालेवान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता "असे काहीच नाही. आमच्याजवळ पुर्ण कागदपत्रे आहे.आम्ही चुकीचे कधीच काही करत नाही.जमीनीचा अॉनलाईन ७/१२ वगैरे पाहु शकता.आम्ही त्यांच्या सोबत करार करूनच काम करीत आहो.डोहे यांचे म्हणणे होते की सदर जागा आम्ही खरेदी केली.परंतु आजच्या परिस्थितीत ही जागा शासनाच्या रेकॉर्डमध्ये पेटकर यांच्या नावाने आहे. आणि ज्यांच्या नावाने ७/१२ असेल आपण त्यांनाच मालक धरू.आमचे सर्व बरोबर आहे,काहीच ईश्यु नाही" अशी प्रतिक्रिया त्यांनी News34 ला दिली.आता मात्र डोहे यांच्या तक्रारीची शासनाचे संबंधित अधिकारी काय आणि कशाप्रकारे दखल घेतात याकडे लक्ष लागले आहे.
-------------//---------