गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
उन्हाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सुचना राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना तहसील कार्यालयाच्या सभागृहात ६ एप्रिल रोजी पाणीटंचाईच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी तालुक्यातील ११९ गावातील प्रतिनिधींची उपस्थिती होती.कोरोना नियमांचे पालन करून पाणीपुरवठा करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आमदारांनी जाणून घेतल्या.
याप्रसंगी सन २०२०-२१ या वर्षातील आत्महत्याग्रस्त शेतकरी पात्र लाभार्थी कोठोडा(बू )येथील चंद्रकला मोतीराम तोडासे तसेच निमनी येथील सविता मंगेश तिखट यांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.उपसभापती सिंधुताई आस्वले, जि.प.सदस्य कल्पना पेचे,विनाताई मालेकर, जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, पं.स.माजी सभापती श्याम रणदिवे, माजी उपसभापती संभा कोवे,तहसीलदार महेंद्र वाकलेकर,उत्तम पेचे,सुरेश मालेकर,बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर,नांदा ग्रा.पं.सदस्य अभय मुनोत,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, यु.काँ.तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे,नायब तहसीलदार चिडे, सहायक उपअभियंता दराडे,सहभियंता विद्युत विभाग इंदूरकर, तालुक्यातील सरपंच,उपसरपंच आणि ग्रामसेवकांची उपस्थिती होती.ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा कमी पडते किंवा शासकीय विहिरीवर किंवा हातपंपांमध्ये पाणी कमी पडते अशावेळी संबंधित गावातील खाजगी बोरवेल व विहिरीत पाणीसाठा उपलब्ध असल्यास त्या तात्काळ अधिग्रहीत करण्यात याव्या व यासंदर्भात प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविण्याच्या सूचना आमदार धोटे यांनी विवीध गावातील सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकांना दिल्या आहे.
