भद्रावती - बरांज येथील खुल्या कोळसा खाणीतून माती व कोळसा उत्खननाचे काम सुरू असून त्याची जड वाहतूक बरांज मोकासा पोच मार्गावरून केल्या जात आहे, ह्या जड वाहतुकीमुळे ग्रामस्थांना जीव हातात घेऊन ये-जा करावी लागत आहे.
बरांज मोकासा कोळसा खाणीत जे कामगार काम करीत आहे ते सर्व परप्रांतीय असून त्यांच अद्याप पावेतो पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा झाले नाही, त्यामुळे गावातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
माती व कोळशाच्या जड वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नसून यासंदर्भात नरेंद्र जीवतोडे, ग्रामपंचायत बरांज येथील सरपंच मनीषा प्रकाश ठेंगणे, पंचायत समिती सभापती व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी प्रवीण ठेंगणे यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन सुद्धा दिले मात्र निवेदनावर कसलीही कारवाई न झाल्याने आज ग्रामस्थांनी जड वाहतूक थांबवली.
प्रकल्पग्रस्त नरेंद्र जीवतोडे यांनी ह्या जड वाहतुकीच्या विरोधात झाडावर चढून, स्वतःजवळ फास व पेट्रोल घेऊन आंदोलन केले.
मात्र पोलीस प्रशासनाने बरांज या गावी दाखल होत ग्रामस्थांचे काही न ऐकता जड वाहतूक सुरळीत करीत आंदोलकांना ताब्यात घेतले.
जोपर्यंत गावातील पोच मार्गावरून होणारी जड वाहतूक थांबणार नाही तोपर्यंत ग्रामस्थ आंदोलन करीत राहणार असा इशारा सुद्धा बरांज गावातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

